Australia Women tour of India: ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघानं पाचव्या आणि शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात (IND W vs AUS W) भारताचा 54 धावांनी पराभव केला. या पराभवासह भारतानं 4-1 अशी मालिका गमावली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघानं निर्धारित 20 षटकात चार विकेट्स गमावून भारतासमोर 197 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघ 142 धावांवर ऑलआऊट झाला. या सामन्यात ग्राहमनं हॅटट्रिक घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.
ऍशले गार्डन आणि ग्रेस हॅरिसचं तुफानी अर्धशतकं
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघानं पहिल्या 10 षटकात 67 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर ऍशले गार्डनरनं 32 चेंडूत नाबाद 66 धावांची धडाकेबाज खेळी केली. ज्यात 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. ग्रेस हॅरिसनं 35 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी केली. ज्यात सहा चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. दोघांमध्ये पाचव्या विकेट्ससाठी 62 चेंडूत 129 धावांची भागिदारी झाली. या दोन फलंदाजांमुळं ऑस्ट्रेलियानं भारतासमोर विशाल धावसंख्येचा डोंगर उभारला. भारताकडून अंजली सरवानी, दिप्ती शर्मा, शेफाली वर्मा आणि देविका वेद्य यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतली.
भारताची खराब फलंदाजी
ऑस्ट्रेलियानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दरम्यान, चौथ्याच चेंडूवर स्मृती मानधनाच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर शेफाली वर्माही स्वस्तात माघारी परतली. त्यानतंर हरलीन देओलनं 16 चेंडूत 24 धावांची खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. पण ती धावबाद होताच भारताचा डाव गडगडला. भारतानं अखेरच्या सहा षटकात 88 धावा करून सात विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्राहमनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, ऍशले गार्डनरनं दोन विकेट्स मिळवल्या. याशिवाय, डार्सी ब्राऊन, तहिला मेग्राथ, अनॅबेल सदरलँड यांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक जमा झाली.
दीप्ती शर्माची एकाकी झुंज व्यर्थ
दीप्ती शर्मानं एकाकी झुंज देत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दीप्तीनं 34 चेंडूत 53 धावांची खेळी खेळली, पण ती आपल्या संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरली.
भारताची प्लेईंग इलेव्हन:
स्मृती मानधना, शेफाली वर्मा, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), देविका वैद्य, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, अंजली सरवाणी, रेणुका ठाकूर सिंह.
ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन:
बेथ मूनी (विकेटकिपर), फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), ऍशले गार्डनर, एलिस पेरी, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, हीदर ग्राहम, अलाना किंग, किम गर्थ, डार्सी ब्राउन.
हे देखील वाचा-