मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. यापैकी अॅडलेडमध्ये खेळवलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाहून भारताच्या दिशेने रवाना झाला आहे. विराट लवकरच बाबा बनणार असून तो पॅटर्निटी लीव्ह घेऊन भारतात माघारी परतणार आहे. त्याच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणेवर संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


कोहली भारतात परतला, रहाणेकडे संघाचं नेतृत्त्व
विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माची प्रसुती जानेवारी महिन्यात होणार आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावं यासाठी तो भारतात परतत आहे. याआधीच त्याने बीसीसीआयकडून पॅटर्निटी लीव्ह घेतली आहे. खरंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर भारतीय संघाला विराटची गरज होती. पण तो सध्या पॅटर्निटी लीव्हवर असल्यामुळे उर्वरित सामन्यात अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं आहे.

विराटचा खेळाडूंना खास मेसेज
ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतण्यापूर्वी त्याने संघातील सहकाऱ्यांसह बैठक घेतली. यावेळी मालिकेतील उर्वरित सामान्यात चांगली कामगिरी करण्यासाठी त्याने खेळाडूंचं मनोधैर्य वाढवलं. मागील सामना विसरुन पुढील सामन्यांवर लक्ष केंद्रित करा आणि स्वत:वर विश्वास ठेवा अशा शब्दात कोहलीने खेळाडूंना उर्वरित सामन्यांसाठी प्रेरित केलं. आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांसह मैदानात उतरुन उत्तम कामगिरी करा, असं विराट म्हणाला. दरम्यान रोहित शर्मा सध्या सिडनीमध्ये क्वॉरन्टाईन आहे.

दुसऱ्या कसोटीत उत्तम कामगिरीची अपेक्षा
पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर आता भारतीय संघ मेलबर्नमध्ये 26 डिसेंबरला बॉक्सिंग डेला दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अॅडलेडमधील डे-नाईट कसोटीच्या पहिल्या डावात 74 धावा केल्या होत्या.परंतु भारतीय खेळाडूंना दुसऱ्या डावात फारशी कमाल दाखवता आली नाही आणि संपूर्ण संघ अवघ्या 36 धावांवर गारद झाला. यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाचा पराभवाचा सामना करावा लागला. आता मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा भारतीय क्रिकेटचाहते व्यक्त करत आहेत.