कानपूर : भारतीय क्रिकेट संघात टी20 विश्वचषकानंतर काही महत्त्वाचे बदल झाले. यामध्ये टी20 संघाचं कर्णधारपद विराटने सोडल्याने ते रोहितकडे गेलं आहे. तर मुख्य प्रशिक्षकपद रवी शास्त्रींनी सोडल्यानंतर राहुल द्रविड याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. राहुलने संघाचा चार्ज घेताच पहिल्या मालिकेत संघाला दमदार विजय मिळवून दिला. न्यूझीलंडविरुद्ध भारताने टी20 मालिका 3-0 ने जिंकली. ज्यानंतर आता कसोटी मालिकेतही भारत चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान संघाला प्रशिक्षणासोबत राहुलने माणूसकी आणि खेळाडू वृत्ती जपत पहिला सामना अनिर्णीत सुटल्यानंतरही दमदार सामना झाला म्हणून खेळपट्टी तयार करणाऱ्या ग्राऊंड स्टाफला 35 हजारांचं बक्षिस दिलं आहे.


पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने सामन्यानंतर मीडियाशी बोलताना सांगितले की,"आम्ही अधिकृतपणे सांगू इच्छितो की, राहुल द्रविडने ग्राऊंड्समननी चांगली खेळपट्टी बनवली म्हणून त्यांना स्वत:हून 35 हजार रुपये बक्षिस म्हणून दिले." राहुल हा कायमच त्याच्या खेळाडू आणि शांत वृत्तीसाठी ओळखला जातो. भारतीय कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुलने प्रशिक्षक म्हणूनही उल्लेखणीय कामगिरी केली आहे. आधी अंडर 19 भारतीय संघाला प्रशिक्षण दिल्यानंतर आता राहुल भारतीय संघाचा प्रशिक्षक झाला आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


असा झाला सामना


भारतानं पहिल्या डावात 345 आणि दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 234 धावा करून डाव घोषीत केला. दुसरीकडं न्यूझीलंडनं पहिल्या डावात 295 धावा केल्या होत्या. ज्यामुळं भारताला 49 धावांची आघाडी मिळाली. ज्यानंतर श्रेयस आणि साहा यांच्या अर्धशतकासह भारताने 234 धावा स्कोरबोर्डवर लावत न्यूझीलंडला विजयासाठी 284 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या न्यूझीलंडने 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली. सामना हातातून शेवटपर्यंत न्यूझीलंडच्या खेळाडूंनी गमावला नाही. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अतिशय संयमी खेळी केली. भारताला एका विकेटची गरज असताना रचिन रवींद्र आणि एजाज पटेल या दोघांनी 9 वी विकेट गेल्यानंतर पुढचे 52 चेंडू खेळून काढले. 52 चेंडूत केवळ 10 धावा करत त्यांनी सामना अनिर्णीत करण्यात यश मिळवलं. 


 हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha