Jasprit Bumrah Injury Update : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) मागील बऱ्याच काळापासून दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे मागील बराच काळ त्रस्त आहे. ज्यानंतर आता बुमराह पाठीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी न्यूझीलंडला गेला आहे. अनेक महिने शस्त्रक्रियेला विलंब केल्यानंतर बुमराह पुढील आठवड्यात डॉ रोवन शौटेन यांच्या देखरेखीखाली शस्त्रक्रिया करणार आहे. शौटेन या किवी सर्जनने शेन बाँड व्यतिरिक्त जोफ्रा आर्चरसारख्या दिग्गज खेळाडूचं देखील ऑपरेशन केलं आहे.


दरम्यान, या ऑपरेशननंतर बुमराहला तंदुरुस्त होण्यासाठी तीन-चार महिने लागतील आणि त्यानंतर पुन्हा अॅक्शनमध्ये येण्यासाठी थोडा वेळ लागेल. ज्यामुळे बुमराह विश्वचषक 2023 साठी तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे. तो आधीच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, WTC फायनल आणि IPL 2023 मधून बाहेर पडला आहे. दरम्यान “जसप्रीत बुमराह पाच दिवसांपूर्वी पाठीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी न्यूझीलंडला रवाना झाला होता. डॉक्टरांनी बुमराहला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिल्यानंतर बीसीसीआयने तातडीने सर्व व्यवस्था करून त्याला पाठवले. एक-दोन दिवसांत शस्त्रक्रिया केली जाईल,” असं बीसीसीआयच्या सूत्रांकडून समोर आलं आहे.


दुखापतीमुळे बुमराह विश्वचषकालाही मुकला


मागील वर्षभर बुमराह दुखापतीमुळे तसंच विश्रांती घेण्यासाठी संघात आत-बाहेर असल्याचं दिसून येत होतं, पण आता गेले काही महिने तो अजिबातच संघात नसल्याचं दिसून येत आहे. 2022 मध्ये आशिया कपपूर्वी बुमराह इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर आशिया कप सामन्यांनाही मुकला होता. त्यानंतर विश्वचषकाची तयारी म्हणून बुमराहला संघात पुन्हा बोलवण्यात आलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचे दोन सामने तो खेळला पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांआधी तो दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. ज्यानंतर तो संपूर्ण टी20 विश्वचषकाला देखील मुकला. आता श्रीलंका, न्यूझीलंड दौऱ्यांतही खेळू शकला नाही. आताही ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामन्यात तो संघात नसून एकदिवसीय सामन्यांत खेळेल का हे पाहावं लागेल.


कधी झाली दुखापत?


जुलै 2022 मध्ये जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेनंतर पाठदुखी सतावू लागली. त्यानंतर तो तिसरा सामना खेळला नाही. ऑगस्ट 2022 मध्ये, तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला. वेळेत तंदुरुस्त न झाल्यामुळे तो ऑगस्ट 2022 मध्ये आशिया कपमधून बाहेर पडला होता. सप्टेंबर 2022 मध्ये, त्याने T20 विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुनरागमन केलं. या मालिकेत 5 षटकं टाकल्यानंतर त्याची जुनी दुखापत पुन्हा सतावू झाली. ऑक्टोबर 2022 मध्ये तो T20 विश्वचषकातून बाहेर पडला. नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्याला तो मुकला होता. डिसेंबरमध्ये बांगलादेश दौऱ्यावर जाऊ शकलो नाही. जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे संघात होता पण पाठदुखीमुळे त्याने माघार घेतली. फेब्रुवारी 2023 मध्ये, जसप्रीत बुमराहला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, आयपीएल आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून वगळण्यात आलं आहे.


हे देखील वाचा-