Ravindra Jadeja: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) राजकारणात प्रवेश केला आहे. रवींद्र जडेजा भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा गुजरातच्या जामनगरमधून भाजपच्या आमदार आहेत. रिवाबाने नुकतीच रवींद्र जडेजाबद्दलची ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. 


टी-20 विश्वचषक 2024 च्या विजयानंतर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. गुजरातमधील निवडणुकीच्या काळात रवींद्र जडेजा पत्नी रिवाबासोबत अनेकदा प्रचार दिसून आला. निवडणुकीदरम्यान रवींद्र जडेजा पत्नी रिवाबासोबत भाजपचा प्रचार करताना दिसला. आता रवींद्र जडेजा भाजपचे सदस्य देखील झाला आहे. 


रिवाबा जडेजा काय म्हणाली?


रिवाबा जडेजाने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये रवींद्र जडेजा भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्य झाला आहे, असं म्हटलं आहे. दरम्यान टी-20 विश्वचषक 2024 नंतर रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट देखील घेतली होती.






रोहित, कोहलीनंतर जडेजाने जाहीर केली होती निवृत्ती-


विराट कोहली, रोहित शर्मानंतर रवींद्र जडेजानं देखील टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुसाट वेगानं अभिमानानं धावणाऱ्या अश्वाप्रमाणं  माझ्या देशासाठी मी माझं सर्वोत्तम देण्याचा नेहमी प्रयत्न केला. इतर फॉरमॅटमध्ये मी माझं सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे. टी 20 विश्वचषक जिंकण हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. माझ्या टी 20 कारकिर्दीचं सर्वोच्च शिखर आहे. अनेक आठवणी, प्रोत्साहन अन् पाठिंब्यासाठी सर्वांना धन्यवाद, असं रवींद्र जडेजा म्हणाला.


रवींद्र जडेजाची आतापर्यंतची कामगिरी-


रवींद्र जडेजाने टी-20 विश्वचषक 2024 नंतर टी-20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रवींद्र जडेजाने भारतासाठी 74 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये 515 धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये रवींद्र जडेजाने 54 विकेट्सही घेतल्या आहेत. रवींद्र जडेजाची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 15 धावांत 3 विकेट्स...रवींद्र जडेजा अजूनही भारताकडून एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे. भारताला सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. टीम इंडियाला पुढील काही महिन्यांत अनेक कसोटी सामने खेळायचे आहेत, अशा परिस्थितीत जडेजाचे पुनरागमन भारतासाठी खूप महत्त्वाचे असेल.


संबंधित बातमी:


यशस्वी जैस्वालच्या फोटोची सोशल मीडियावर पुन्हा रंगली चर्चा; कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?