Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर (Abhishek Nayar) याला केवळ आठ महिन्यांनंतर 'बीसीसीआय'ने जबाबदारीतून मुक्त केले. अभिषेक नायरसह क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आणि प्रशिक्षक सोहम देसाई यांनाही संघातून काढून टाकण्यात आले आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात संपलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील खराब कामगिरी आणि ड्रेसिंग रूममधून लीक झालेल्या गोष्टी लक्षात घेऊन बीसीसीआयने हे कठोर पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मात्र याचदरम्यान अभिषेक नायरसह टी. दिलीप आणि प्रशिक्षक सोहम देसाईंना काढण्यामागील कारण समोर आलं आहे.
आयएएनएसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या काही बोर्ड सदस्यांनी म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये इतके लोक असण्याचा काही अर्थ नाही. भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये जास्त लोक असल्याने बीसीसीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अभिषेक नायर, टी. दिलीप किंवा देसाई यांच्या खराब कामगिरीमुळे हा निर्णय घेतला आहे, असं नाही.
भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 1-3 ने गमावली-
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. बॉर्डर-गावस्कर मालिका कर्णधार रोहित शर्मासह संपूर्ण संघासाठी चांगली नव्हती. या मालिकेनंतर टीम इंडियावर प्रश्न उपस्थित केले गेले. भारताच्या प्रशिक्षकपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 1-3 ने गमावली, या मालिकेत अश्विनने अचानक निवृत्ती घेतली. भारतीय ड्रेसिंग रूममधूनही बातम्या आल्या, ज्यामुळे हे प्रकरण आणखी तापले. एका सदस्याने बीसीसीआयकडे याबद्दल तक्रारही केली होती.
केंद्रीय करारातही होणार मोठे बदल-
आयपीएल 2025 च्या उद्घाटन समारंभाच्या दिवशी बीसीसीआयच्या सर्वोच्च समितीची बैठक झाली. यावेळी केंद्रीय कराराबद्दल सखोल चर्चा झाली. बैठकीनंतर दोन दिवसांनी, भारतीय महिला क्रिकेट संघाचे करार जाहीर करण्यात आले. पण पुरुष संघाचे करार अद्याप जाहीर झालेले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुष संघाच्या केंद्रीय करारात मोठे बदल दिसून येऊ शकतात. यामुळे, काही मोठी नावे वगळली जाऊ शकतात. त्याच वेळी, आयपीएलनंतर इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआय केंद्रीय कराराची घोषणा करू शकते.