Zimbabwe vs India 3rd T20: भारत आणि झिम्बाब्वे (Ind vs Zim) यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने टीम इंडियाचा पराभव केला आणि त्यानंतर दुसऱ्या टी-20 मध्ये भारतीय संघाने आक्रमक फलंदाजी करत विजय मिळवला.
आज भारत आणि झिम्बाब्वेमध्ये तिसरा टी-20 सामना होणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 4.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. याआधी टी-20 विश्वचषक विजेत्या संघातील तीन खेळाडू टीम इंडियामध्ये सामील झाले आहेत. आतापर्यंत जो टीम इंडियाचा संघ होता तो फक्त पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी होता. आता तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टी-20 साठी सलामीवीर यशस्वी जैस्वाल, यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि अष्टपैलू शिवम दुबे टीम इंडियाचा भाग असतील.
प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल-
शिवम दुबे, संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वालच्या आगमनामुळे, कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासाठी प्लेइंग इलेव्हनची निवड करणे अजिबात सोपे होणार नाही. त्यामुळे आजच्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी कोणत्या खेळाडूंची निवड होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
खेळपट्टी कशी असेल?
खेळपट्टी फिरकीला अनुकूल झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याच्यासह सहकारी खेळाडूंना फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. हरारे स्पोर्टस क्लबच्या खेळपट्टीवर अतिरिक्त उसळी आहे. फिरकीपटू रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा मारा खेळणे यजमानांना कठीण जात आहे. पहिला सामना १३ धावांनी गमविल्यानंतर भारतीय संघाने वेळेचे भान राखून पाच तज्ज्ञ गोलंदाज खेळविले होते. यजमान फलंदाज भारतीय गोलंदाजांच्या जाळ्यात अलगद अडकत गेले.
उर्वरित तीन टी-20 साठी संपूर्ण भारतीय संघ-
शुभमन गिल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, अभिषेक शर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवी बिष्णोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार आणि तुषार देशपांडे.
उर्वरित तीन सामने हरारे येथेच खेळवले जाणार-
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा टी-20 सामना 10 जुलै रोजी, चौथा T20 सामना 13 जुलै रोजी आणि पाचवा आणि अंतिम T20 सामना 14 जुलै रोजी खेळवला जाईल. हे सर्व सामने फक्त हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवले जातील. पहिला आणि दुसरा टी-२० सामनाही हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर झाला.
उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक
तिसरा T20- बुधवार (10 जुलै)
चौथा T20- शनिवार (13 जुलै)
पाचवा T20- रविवार (14 जुलै)