IND vs SL Asia Cup 2022 Final : महिला आशिया चषक 2022 (Womens Asia Cup 2022) स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघात (Sri Lanka Women vs India Womens) सुरु आहे. यावेळी प्रथम गोलंदाजी करताना भारतीय महिलांनी उत्कृष्ट बोलिगंचं दर्शन घडवलं आहे. भारताने श्रीलंका संघाला अवघ्या 65 धावांमध्ये रोखलं असून ज्यामुळे आता आशिया चषक उंचवण्यासाठी भारताला 20 षटकांत 66 धावांची गरज आहे. 


सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय महिलांनी त्यांचा हा निर्णय साफ चूकीचा ठरवत सुरुवातीपासून एक-एक श्रीलंकेच्या फलंदाजांना तंबूत धाडायला सुरुवात केली. श्रीलंकेच्या संघानं दुहेरी संख्या गाठण्याआधीच त्यांचे 4 फलंदाज तंबूत पोहोचले होते. श्रीलंकेकडून केवळ ओशादी रणसिंघेने 13 आणि इनोका रणवीराने नाबाद 18 धावा केल्यामुले त्यांनी 65 धावांपर्यंत मजल मारली. ज्यामुळे भारताला विजयासाठी आता 66 धावांची गरज आहे. भारताच्या महिला गोलंदाजांनी तर उत्तम कामगिरी केली. यावेळी रेणुका सिंहने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर रनआऊट करण्यातही तिने मोलाची कामगिरी केली. त्याशिवाय राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या


आशिया चषक फायनलसाठी कसे आहेत दोन्ही संघ?


भारतीय महिला संघ :


शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, दयालन हेमलता, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकिपर), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रेणुका सिंह, राजेश्वरी गायकवाड.


श्रीलंका महिला संघ :


चमारी अट्टापट्टू (कर्णधार), अनुष्का संजीवनी (विकेटकिपर), हर्षिता मडावी, हसिनी परेरा, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहरी, मलशा शेहानी, ओशादी रणसिंघे, सुगंधिका कुमारी, इनोका रणवीरा, अचिनी कुलसूरिया.


सुरुवातीपासून दमदार कामगिरी करत भारत फायनलमध्ये


यंदाच्या महिला टी20 आशिया चषक 2022 स्पर्धेत भारतीय महिलांनी पहिल्या सामन्यापासून उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली आहे. यावेळी पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात मलेशियाचा 30 धावांनी मात दिली. यानंतर यूएईवर मोठा विजय नोंदवत त्यांचा 104 धावांनी पराभव केला.  यावेळी भारतीय केवळ पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर बांगलादेश आणि थायलंडचा पराभव करत भारतानं स्पर्धेत दमदार कमबॅक केलं. ज्यानंतर सेमीफायनलमध्ये थायलंडचा 74 धावांनी पराभव करत भारत फायनलमध्ये पोहोचला आहे.


हे देखील वाचा - 


Kohli Twitter Trend : नेटकऱ्यांकडून थेट विराट कोहलीला अटक करण्याची मागणी, #ArrestKohli व्हायरल, वाचा काय आहे नेमकं प्रकरण?