Asia Cup 2023, IND vs SL : श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातले. अवघ्या 20 वर्षांच्या डुनिथ वेल्लालागे याने भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना तारे दाखवले. वेल्लालागे याने विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल यांना बाद करत टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरंग लावला. वेल्लालागे याच्यापुढे भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. वेल्लालागे याने पाच विकेट घेतल्या. 


भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 213 धावांपर्यंत मजल मारली. फिरकी गोलंदाजापुढे टीम इंडियाचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. रोहित-विराट यांच्यासह टीम इंडियाचे पाच फलंदाजांनी वेल्लालागे याच्यासमोर गुडघे टेकले. वेल्लालागे  याने 10 षटकात 40 धावा खर्च करत भारताच्या पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. वेल्लालागे याने 
भारतीय कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांना तंबूत पाठवले. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. 11.1 षटकात 80 धावांची सलामी दिली. पण वेल्लालागे गोलंदाजीला आल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. 


भारताचा संपूर्ण डाव फिरकी गोलंदाजांनी संपुष्टात आणला. वनडे क्रिकेटच्या इतिहासात भारताविरोधात फिरकी गोलंदाजांनी दहा विकेट घेण्याची प्रथमच वेळ होय. वेल्लालागे याने पाच फलंदाजांना तंबूत धाडले. असलंका याने 9 षटकात 18 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. तर तिक्ष्णा याला एक विकेट मिळाली. 






भारताची फलंदाजी ढेपाळली - 


भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलंबोची खेळपट्टी पाहून रोहित शर्माने टीम इंडियात अक्षर पटेल याला संधी दिली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियासाठी सावध सुरुवात केली. दोघांनी 80 धावांची भागिदारी केली. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने वेल्लालागे याच्या हातात चेंडू दिला.. त्याने सामन्याचे चित्रच बदलले. वेल्लालागे याने भारताला एकापाठोपाठ एक धक्के दिला. वेल्लालागे याने सर्वात आधी शुभमन गिल याला 19 धावांवर बाद  केले. त्यानंतर विराट कोहली याला तंबूत धाडले. कोहली फक्त तीन धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा याला 53 धावांवर बाद केले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर ईशान किशन आणि केएल राहुल यांनी डाव सावरला. दोघांनी दमदार भागिदारी केली. पण वेल्लालागे याने राहुल याला बाद करत जोडी फोडली. 


चार दिवसांपासून कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर सामने होत आहेत. त्यातच पावसाचा व्यत्याय त्यामुळे खेळपट्टी गोलंदाजीला पोषक आहे. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक बाद केले. वेल्लालागे याच्यानंतर असलंका याने चार विकेट घेतल्या. असलंका याने रविंद्र जाडेजा, इशान किशन, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना तंबूत धाडले. रविंद्र जाडेजा याने मोहम्मद सिराजच्या साथीने टीम इंडियाची धावसंख्या वाढवली. शुभमन गिल 19, विराट कोहली 3, हार्दिक पांड्या 5 आणि रविंद्र जाडेजा 4 यांना मोठी खेळी करता आली नाही. अखेरीस अक्षर पटेल याने मोहम्मद सिराज याला हाताशी धरत भारताची धावसंख्या 213 पर्यंत पोहचवली. सिराज आणि अक्षर पटेल यांनी 27 धावांची भागिदारी केली. सिराज पाच धावांवर नाबाद राहिला. अक्षर पटेल 26 धावांवर बाद झाला.