Rohit ODI Record : रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. खणखणीत षटकार ठोकत रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पार केला. वेगवान 10 हजार धावांचा टप्पा गाठणारा रोहित हा दुसरा वेगवान खेळाडू ठरलाय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, जो त्याने 205 डावांमध्ये पूर्ण केला. रोहितने आतापर्यंत 241 डावात दहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे. रोहित शर्माला वनडेमध्ये पहिल्या दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी 82 डाव लागले होते. त्यानंतर पुढील 159 डावात रोहित शर्माने 8000 धावा केल्या आहेत. 


रोहित शर्माने श्रीलंकाविरोधात वादळी फलंदाजी करत भारताची धावसंख्या वाढवली. रोहित शर्मा याने 48 चेंडूत 53 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन षठकार आणि सात चौकार ठोकले.  गिल आणि विराट कोहली यांना मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहली तीन धावांवर बाद झाला तर गिल याने 19 धावांचे योगदान दिले. 


रोहित शर्माच्या नावावर हाही विक्रम -
आशिया चषकात रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकरचा क्रमांक आहे.  रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला आठ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. वनडे, कसोटी आणि टी20 मध्ये रोहित शर्मा सलामीला फलंदाजी करतो. आशिया चषकात रोहित शर्मा याने 50 पेक्षा जास्त धावसंख्या दहा वेळा केल्या आहेत, असा पराक्रम करणारा हिटमॅन एकमेव फलंदाज आहे.  


रोहित-विराटचा पराक्रम - 


 विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने दोन धावांची भागिदारी करत पाच हजार धावा पूर्ण केल्या आहेत.  या जोडीने आतापर्यंत 86 डावात 62.47 च्या सरासरीने 5000 धावांची भागिदारी केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये 18 शतकी भागिदारी आणि 15 अर्धशतकी भागिदारी झाल्या आहेत.  रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याआधी वनडे फॉरमॅटमध्येटीम इंडियासाठी आतापर्यंत केवळ 2 जोड्यांनी 5000 धावांचा टप्पा पार पार केला आहे. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली, रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने याआधी पाच हजार धावांची भागिदारी केली. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी वनडेमध्ये 8227 धावांची भागिदारी केली आहे. तर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी 5193 धावांची भागिदारी केली आहे.  या विक्रमाला रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने सुरंग लावलाय.