Sri Lanka vs India 3rd T20: कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेच्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात श्रीलंकेने भारताला 7 गडी राखून पराभूत केले. यासह श्रीलंकेने ही तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. श्रीलंकेने दोन वर्षानंतर द्विपक्षीय टी -20 मालिका जिंकली आहे. याआधी त्यांनी 2019 मध्ये पाकिस्तानविरुद्ध टी -20 मालिका जिंकली होती. त्याचबरोबर भारताविरुद्ध पहिल्यांदाच श्रीलंकेचा संघ टी -20 मालिका जिंकण्यात यशस्वी झाला आहे.
बर्थडे बॉय वनिंदू हसरंगा हा श्रीलंकेच्या विजयाचा नायक होता. पहिल्यांदा गोलंदाजीत हसरंगाने त्याच्या चार षटकांत केवळ 9 धावा देऊन चार महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. आणि नंतर 9 चेंडूत 16 धावांची नाबाद खेळी खेळली.
भारताने वनडे मालिका जिंकली
याआधी भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमानांचा 2-1 असा पराभव केला होता. आता यजमान संघाने टी -20 मालिकेमध्ये आपल्याला पराभूत करून हिशोब चुकता केला आहे. भारताने पहिला टी -20 सामना 38 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. परंतु, श्रीलंकेच्या संघाने दुसरा सामना चार विकेट्सने जिंकून मालिका बरोबरीत आणली. आणि आता तिसरा टी-20 जिंकत मालिका जिंकली.
भारताला 81 धावांवर रोखल्यानंतर यजमानांनी 14.3 षटकांत तीन विकेट्स गमावून विजयाचे लक्ष्य साध्य केलं. अविष्का फर्नांडोने 12, मिनोद भानुकाने 18, धनंजय डी सिल्वाने नाबाद 23 आणि वनिंदू हसरंगाने नाबाद 14 धावा केल्या. भारताकडून राहुल चाहरने तीन गडी बाद केले.
तत्पूर्वी श्रीलंकेने वनिंदूच्या (4/9) गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला 81 धावांवर रोखले. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही आणि संघाला 20 षटकांत आठ गडी बाद 81 धावाच करता आल्या. टीम इंडियासाठी कुलदीप यादवने 28 चेंडूत सर्वाधिक 23 धावा केल्या. श्रीलंकेसाठी, हसरंगा (चार विकेट) वगळता कर्णधार दासून शनाकाने दोन विकेट्स घेतल्या तर रमेश मेंडिस आणि दुशमंता चमीरा यांना प्रत्येकी एक विकेट मिळवली.