IND Vs WI:  वेस्ट इंडीजविरुद्ध हॅमिल्टन (Hamilton) सेडन पार्क (Seddon Park) येथे खेळण्यात आलेल्या विश्वचषकाच्या दहाव्या सामन्यात भारतानं 155 धावांनी विजय मिळवला आहे. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना या विजयाची शिल्पकार ठरली. या दोघांच्या शतकी खेळीमुळं भारतानं वेस्ट इंडीजच्या संघासमोर 318 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युरात वेस्ट इंडीजच्या संघ 162 धावांवर सर्वबाद झाला. या विजयासह भारतानं गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. 


या सामन्यात नाणेफेक जिंकत भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून स्मृती मानधना आणि यस्तीका भाटिया सलामी देण्यासाठी मैदानात उतरल्या. मात्र, या सामन्यातील सहाव्या षटकात यस्तीका भाटीया (31 धावा) बाद झाली. त्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार मिताली राजलाही काही खास कामगिरी करता आली नाही. तिनं नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर 5 धावांवर असताना आपली विकेट्स गमावली. मिताली पाठोपाठ दिप्ती शर्माही स्वस्तात माघारी परतली. तिला या सामन्यात केवळ 15 धावा करता आल्या. दरम्यान, एकाबाजूनं संयमी खेळी करणाऱ्या स्मृती मानधनाला हरमनप्रीत कौरची साथ मिळाली. या दोघांनी तडफदार शतक ठोकून भारताचा स्कोर 300 पार पोहचला. भारतानं 50 षटकात 8 विकेट्स गमावून 317 धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून  अनिसा मोहम्मदनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, हेली मॅथ्यूज, शकेरा सेलमॅन, डॉटीन आणि आलिया अॅलीनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे. 


भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजचे सलामीवीर डिआंड्रा डॉटिन आणि हीली मॅथ्यूजन संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी 12 षटकात 100 धावा केल्या होत्या. दरम्यान, भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीनं 3 षटकात 35 धावा दिल्या. मात्र, स्नेह राणानं दोघांची जोडी तोडली. ज्यामुळं भारतानं सामन्यात पुनारागमन केलं. त्यानंतर वेस्ट इंडीजच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताने वेस्ट इंडिजचा डाव 40.3 षटकांत 162 धावांत गुंडाळला.


हे देखील वाचा-