India vs Sri lanka, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (IND vs SL) आज (12 जानेवारी) दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघ कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर एकमेंकांशी भिडतील. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती, अशा स्थितीत हा सामना श्रीलंकेसाठी 'करो या मरो' चा असेल. मालिका वाचवण्यासाठी त्यांना कोणत्याही किंमतीत सामना जिंकावाच लागेल. भारतीय संघाला हा सामना जिंकून एकदिवसीय मालिकेत विजयी आघाडी मिळवायची आहे. दरम्यान या महत्त्वाच्या सामन्यात दोन्ही संघात बदल होण्याची शक्यता आहे.


दरम्यान या महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका नसण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यादरम्यान तो जखमी झाला होता. त्याच्या जागी लाहिरू कुमाराला प्लेईंग-11 मध्ये स्थान मिळू शकते. या एका बदलाशिवाय श्रीलंकेच्या संघात अन्य कोणताही बदल अपेक्षित नाही. दुसरीकडे टीम इंडियाच्या प्लेईंग-11 मध्ये काही बदल होणार का याचा विचार केल्यास टीम इंडियाला त्यांच्या शेवटच्या सामन्यातील विजयी 11 मध्ये बदल करण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणजेच ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना यावेळीही बाकावर बसावे लागणार आहे. शेवटच्या सामन्यात भारताच्या प्लेइंग-11 मधील सर्व खेळाडूंनी आपापली भूमिका चोख बजावली. रोहित, शुभमन आणि विराटने वरच्या फळीत चांगला खेळ केला. श्रेयस आणि केएल राहुल यांनीही आपापले काम केले होते.


तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल परिपूर्ण दिसत आहेत आणि गोलंदाजीत देखील युझवेंद्र चहल, उमरान मलिक, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज पुन्हा जबाबदारी सांभाळताना दिसतील. गेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा पराभव निश्चितच झाला होता. पण तरीही प्लेईंग 11 पाहता अशा परिस्थितीत टीम इंडियाला आपल्या गोलंदाजांमध्येही कोणताही बदल करायला आवडणार नाही.


दोन्ही संघांचे संभाव्य अंतिम 11


टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक.


टीम श्रीलंका : पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, चरिथ अस्लंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शानाका (क), वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलाल्गे, चमिका करुणारत्ने, कसून राजिथा, लाहिरू कुमारा.


कसं असेल कोलकात्याचं वातावरण?


हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सामन्यादिवशी अर्थात 12 जानेवारीला भारत आणि श्रीलंका वनडे सामन्याच्या दिवशी दुपारी थोडासं वातावरण उष्म असेल. तर सायंकाळनंतर तापमानात घट होईल. गुरुवारी कोलकात्यात दिवसाचे तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, रात्रीच्या वेळी त्यात घट होईल आणि ते 18 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. सामन्याच्या दिवशी कोलकातामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. यावरून भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारा दुसरा सामना कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


हे देखील वाचा-