India vs Pakistan : विश्वचषकात शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये महामुकाबला होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. 1.25 लाख प्रेक्षकांची क्षमता असलेल्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या सामन्यादरम्यान रोहित शर्माच्या चाहत्याने त्याच्यासाठी एक खास भेटवस्तू तयार केली आहे. रोहित शर्माला सोन्याची बॅट गिप्ट म्हणून मिळणार आहे. रोहित शर्माच्या चाहत्याने ही बॅट खास त्याच्यासाठी तयार केली आहे. हा चाहता व्यवसायाने सोनार आहे, तो सोन्या-चांदीचे काम करतो.


अहमदाबादच्या चाहत्याने सोन्याची विश्वचषक ट्रॉफी तयार केली आहे. त्या चषकाचे वजन 0.900 ग्रॅम इतके आहे. त्या चाहत्याला ही सोन्याची ट्रॉफी रोहित शर्माला भेट द्यायची आहे. या चषकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


रोहित शर्माला दिले जाणार स्पेशल गिफ्ट


अहमदाबादमध्ये शनिवारी रोहित शर्माला सोन्याची विश्वचषक ट्रॉफी नक्कीच मिळेल, पण खरी विश्वचषक ट्रॉफी मिळवण्यासाठी रोहित शर्माच्या संघाला पुढील 40 दिवस उत्कृष्ट क्रिकेट खेळावे लागणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्याच मैदानावर विश्वचषकाची फायनल होणार आहे. या विश्वचषकात टीम इंडियाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. आता पाकिस्तानचा क्रमांक आहे. शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हायव्होल्टेज सामना होणार आहे. 







पाकिस्तान संघानेही विश्वचषकात पहिले दोन सामने जिंकून शानदार सुरुवात केली. नेदरलँड आणि श्रीलंका यांच्याविरोधात विजय मिळवला. श्रीलंकाविरोधात पाकिस्तान संगाने 344 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत इतिहास रचला. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग होय. त्यामुळे पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल  तरी भारतासमोर त्यांचे आव्हान सोपे नसेल.भारतीय संघाच्या वेगवान माऱ्यासोबतच फिरकी गोलंदाजही भन्नाट फॉर्ममध्ये आहेत. कुलदीप यादवची फिरकी आणि बुमराहच्या वेगवान गोलंदाजांपुढे टिकून राहणे पाकिस्तानी फलंदाजासाठी सोपे नसेल. त्याचबरोबर गेल्या काही सामन्यांमध्ये भारताची फलंदाजीही शानदार राहिली आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला पराभूत करणे पाकिस्तानसाठी खूप कठीण जाणार आहे.