अहमदाबाद : वर्ल्ड कपमधील सर्वात रोमांचक आणि क्रिकेट विश्वाला श्वास रोधून धरायला लावणाऱ्या सामन्याला अवघ्या काही तासांचा कालावधी राहिला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला उद्या शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे एकंदरीतच या सामन्यासाठी आतापासूनच आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोन्हीकडून डिवचण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. यादरम्यानच भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) केलेल्या इन्स्टास्टोरीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
त्याने आपल्या स्टोरीवर मजेशीर पोस्ट करत लक्ष वेधले आहे. त्यांनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की "भाई लोक घर पे अच्छे-अच्छे टीव्ही है, सब एन्जॉय करो और एसी मे बैठके मॅच देखो. नो मोर तिकीट रिक्वेस्ट प्लीज" त्यामुळे एकंदरीत भारत आणि पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
काही आठवड्यांपूर्वी, कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हे देखील स्पष्ट केले होते की तो वर्ल्ड कप तिकिटांसाठी कोणत्याही विनंत्या पूर्ण करू शकणार नाही. अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तान सामना जवळ येत असताना, तिकीट मिळण्याच्या आशेने चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) हा सामना वर्ल्डकपमध्ये निश्चित झाल्यापासूनच तिकीट हा मोठा डोकेदुखीचा विषय झाला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयकडून या सामन्यासाठी 14000 तिकिटे रिलीज करण्यात आली होती. अनेक तिकिटांचे दर हे काही लाखांमध्ये जाऊन पोहोचले आहेत. इतकेच नव्हे तर अहमदाबाद स्टेडियमच्या अवतीभवती असणारे हॉटेल सुद्धा फुल्ल झाली आहेत. मिळेल तिथून तिकट घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अर्थातच सूर्यकुमार यादवची ही पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, उद्याच्या सामन्यासाठी जय्यत तयारी पण सुरू आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकत दमदार कामगिरी केली आहे. तर दुसरीकडे, पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला होता. वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठं टार्गेट चेस पाकिस्तान टीमने केले होते. दुसरीकडे भारतानेही अफगाणिस्तानला चारीमुंड्या चीत करत आरामात विजय मिळवला. भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी बलस्थान असले तरी पाकिस्तानी संघाला मिळालेला सूर सुद्धा आव्हानात्मक ठरू शकतो.
दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम अजूनही चाचपडतो आहे. त्यामुळे त्याच्या फॉर्मची चिंता पाकिस्तानसाठी निश्चित असेल. दरम्यान, क्रिकेट विश्वाचे सर्वाधिक लक्ष हे शुभमन गिलकडेही असेल. उद्याच्या सामन्यामध्ये तो खेळणार की नाही? याकडे लक्ष आहे. गिल डेंगूग्रस्त झाल्याने तो पहिल्या दोन सामन्यासाठी मुकला आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात गिल खेळणार की नाही? या प्रश्नाचे उत्तर आता उद्याच मिळणार आहे. गिल अहमदाबादमध्ये पोहोचला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या