India vs Pakistan Fakhar Zaman : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यादरम्यान पावसाने खोडा घातला आहे. मुसळधार पावसामुळे सामना थांबवावा लागलाय. यात अचानक पाकिस्तानचा स्टार खेळाडू फखर जमान अचानक सोशल मीडियावर व्हायरल झालाय. खेळपट्टी आणि मैदानावर कव्हर्स टाकण्यासाठी फखार जमान याने मैदानाच्या कर्मचाऱ्यांची मदत केली. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अचानक व्हायरल झाले. दरम्यान, पावसामुळे सामना थांबेपर्यंत भारताने 24.1 षटकात दोन बाद 147 धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी कोलंबोत पावसाचे वातावरण नव्हते. भारतीय संघाने 24 षटके फलंदाजी केल्यानंतर मुसळधार पावसाने सुरुवात केली. वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात केल्यानंतर ग्राऊंड स्टाफने धावत येत मैदानावर कव्हर्स टाकले. त्या कर्मचाऱ्यांना पाकिस्तानचा खेळाडू फखार जमान याने मदतीचा हात दिला. कव्हर्स वजनाने जड असतात त्यामुळे ओढताना मेहनत घ्यावी लागते, फखर जमान त्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावला. फखर जमान याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भारत आणि पाकिस्तानचे चाहते फखरचे कौतुक करत आहेत. 














नाणेफीकाच कौल पाकिस्तानच्या बाजूने, भारताची दमदार सुरुवात 


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी बाबरचा निर्णय चुकीचा ठरवला. दोघांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 100 चेंडूत 121 धावांची दमदार सलामी दिली. रोहित शर्माने 49 चेंडूत 56 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये चार षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. तर गिल याने 52 चेंडूत 58 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने 10 चौकार लगावले. सामना थांबला तेव्हा विराट कोहली 8 आणि केएल राहुल 17 धावांवर फलंदाजी करत होते. 


पावसामुळे आज सामना झाला नाही तर... 


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना वगळता आशिया चषक 2023 स्पर्धेतील कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नाही. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यालाही राखीव दिवस नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे आशिया चषक स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, अंतिम सामना आणि सुपर-4 फेरीतील भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्यात आला आहे. हे दोन्ही सामने जेव्हा सुरू होतील, त्याच दिवशी संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी सामना छोटा झाला, तरीही त्याच दिवशी संपवला जाईल. असे असूनही सामना पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी जिथे सामना रोखण्यात आला होता, तिथूनच सुरू केला जाईल.