India vs New Zealand 1st Test: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने 8 विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तब्बल 36 वर्षांनंतर भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला. भारताच्या पराभवानंतर नेटकऱ्यांकडून केएल राहुलला जबाबदार धरण्यात येत आहे. मात्र फक्त केएल राहुलच नव्हे, तर भारतीय संघाला पाच चुका महागात पडल्याचे दिसून आले. 




1- संघात तीन फिरकीपटूंचा समावेश


पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तरीही टीम इंडियाने 3 फिरकीपटूंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर न्यूझीलंड संघ तीन वेगवान गोलंदाजांसह आला होता. भारताकडे तीन वेगवान गोलंदाज असते तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.


2- नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी-


नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चुकीचा होता, असं स्वत: रोहित शर्माने पत्रकार परिषदेत मान्य केले. पावसाळी वातावरण, खेळपट्टी आणि ढगाळ आकाश असतानाही रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले असते तर भारत हा कसोटी सामना जिंकू शकला असता.


3- टीम साउदीला रोखण्यात अपयश-


भारताच्या 46 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडची एकवेळची धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यात 233 धावा होती. टीम साउदीला 65 धावांची खेळी खेळण्यापासून रोखले असते तर या सामन्याचा निकाल बदलू शकला असता. साउदीने 5 चौकार आणि 4 षटकार टोलावले. टीम इंडियाने साउदीला जास्त धावा करण्यापासून रोखले असते तर न्यूझीलंडची आघाडी 300 धावांपेक्षा जास्त झाली नसती.


4- पहिल्या डावात भारत अवघ्या 46 धावांवर गारद-


पहिल्या डावात शून्यावर बाद झालेला केएल राहुल एकमेव खेळाडू नव्हता. टीम इंडियाचे एकूण 6 खेळाडू शून्यावर बाद झाले. अशा परिस्थितीत पराभवासाठी फक्त केएल राहुलला दोष देणे योग्य ठरणार नाही. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाही दोन्ही डावात विशेष काही करू शकला नाही.


5- सामना अनिर्णित करण्याचा विचार केला असता तर...


भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज असते आणि कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या डावात सामना अनिर्णित करण्याचा विचार केला असता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.


संबंधित बातमी:


Ind vs NZ: अष्टपैलू खेळाडू रोहित शर्मासोबत सलामीला येणार?; न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी भारतीय संघात मोठा बदल