India vs New Zealand First Test Match: भारत आणि न्यूझीलंड (India vs NZ) यांच्यातील पहिली कसोटी बंगळुरुमध्ये खेळवली जात आहे. या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसाने गमावला होता, मात्र दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कहर केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने केवळ 46 धावा केल्या. ही भारताची मायदेशातील कसोटी सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या आहे.


न्यूझीलंडकडून हेन्रीने सामन्यात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. याशिवाय विल्यम ओरुकीने 4 विकेट्स पटकावल्या. तर भारताकडून ऋषभ पंत (20) आणि यशस्वी जैस्वाल (13) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. कर्णधार रोहित शर्माने (2) धावा केल्या. विराट कोहली, सर्फराझ खान, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या पाच फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. भारतीय संघाच्या या खराब कामगिरीनंतर रोहित शर्मावर नेटकरी चांगलेच संतापल्याचे दिसून आले. 


जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी-


इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे जवळपास 10 वर्षे जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जोफ्रा आर्चरने सुमारे 10 वर्षांपूर्वी भारताच्या सर्वात कमी कसोटी धावसंख्येची भविष्यवाणी केली होती. जोफ्रा आर्चरने 21 नोव्हेंबर 2014 रोजी ट्विट केले. जोफ्रा आर्चरने ट्विटमध्ये म्हटले आहे की, फक्त 46 अशं लिहिलं आहे. आज तब्बल 10 वर्षांनंतर जोफ्रा आर्चरचे म्हणणे खरे ठरले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ अवघ्या 46 धावांत गारद झाला. आता जोफ्रा आर्चरचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 






न्यूझीलंडची 134 धावांची आघाडी-


टीम इंडियाच्या 46 धावांना प्रत्युत्तर देताना पाहुण्या संघाने तीन गडी गमावून 180 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा संघ आता 134 धावांनी पुढे आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा रचिन रवींद्र 22 धावांवर तर डॅरिल मिशेल 14 धावांवर नाबाद माघारी परतला. या दोघांमध्ये 26 धावांची भागीदारी झाली आहे. याआधी डेव्हन कॉनवेने भारतीय गोलंदाजांविरुद्ध तुफानी फटकेबाजी केली. मात्र, त्याचे शतक हुकले. कॉनवेने 105 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 91 धावा केल्या. याशिवाय टॉम लॅथमने 15 आणि विल यंगने 33 धावा केल्या. कॉनवे आणि लॅथम यांच्यात पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी झाली. यानंतर कॉनवेने दुसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली. तिन्ही फिरकीपटूंनी भारतासाठी आतापर्यंत सर्व विकेट घेतल्या आहेत. कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. याआधी न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 5 विकेट घेतल्या होत्या. युवा वेगवान गोलंदाज विल्यम ओरुकीने चार बळी घेतले.


संबंधित बातमी:


Ind vs NZ: रोहित शर्मा 'कर्णधार कोट्यातून'च संघात खेळतो; BCCI ने बाहेरचा रस्ता दाखवावा, कोण काय म्हणाले?