India vs New Zealand First Test Match: भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ) यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामना बंगळुरुमध्ये सुरु असून या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला. यानंतर दुसऱ्या दिवशी नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ अवघ्या 46 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसअखेर 50 षटकांत 3 विकेट्स गमावत 180 धावा करत एकूण 134 धावांची भक्कम आघाडी मिळविली.






भारताकडून ऋषभ पंत (20) आणि यशस्वी जैस्वाल (13) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. कर्णधार रोहित शर्माने (2) धावा केल्या. विराट कोहली, सर्फराझ खान, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या पाच फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. भारतीय संघाच्या या खराब कामगिरीनंतर रोहित शर्मावर नेटकरी चांगलेच संतापल्याचे दिसून आले. रोहित शर्मा (Rohit Sharma) खराब फटका खेळत झेलबाद झाला. रोहित शर्मा हा आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. स्वतःच्या विक्रमांचा विचार न करता तो संघासाठी खेळतो अशी भावना रोहितच्या खेळीकडे पाहून अनेकांनी व्यक्त केली होती; पण आज रोहित अवघ्या 2 धावांवर बाद झाल्याने चाहते त्याच्यावर  नाराज झाले.


रोहित कर्णधार कोट्यातूनच संघात खेळतो-


सोशल मीडियावर एकाने लिहिले, 'रोहितने स्वतःची विकेट दान करून टाकली. याला आक्रमक क्रिकेट नव्हे, तर बेजबाबदार क्रिकेट म्हणतात.' दुसऱ्याने म्हटले, 'बीसीसीआयने रोहितला संघाबाहेर काढावे. कारण, तो युवा खेळाडूंची जागा वाया घालवतोय.' तिसऱ्या यूजरने खोचक टीका केली. 'युवा खेळाडूंना जास्त खेळायला मिळावं म्हणून रोहित लवकर बाद होतोय,' असा टोला त्याने लगावला. आणखी एकाने लिहिले, 'आता ही बाब पक्की झाली की, रोहित कर्णधार कोट्यातूनच संघात खेळतो.'


न्यूझीलंडची चांगली सुरुवात-


टीम इंडियाच्या 46 धावांना प्रत्युत्तर देताना पाहुण्या संघाने तीन गडी गमावून 180 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा संघ आता 134 धावांनी पुढे आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा रचिन रवींद्र 22 धावांवर तर डॅरिल मिशेल 14 धावांवर नाबाद माघारी परतला. या दोघांमध्ये 26 धावांची भागीदारी झाली आहे. याआधी डेव्हन कॉनवेने भारतीय गोलंदाजांविरुद्ध तुफानी फटकेबाजी केली. मात्र, त्याचे शतक हुकले. कॉनवेने 105 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 91 धावा केल्या. याशिवाय टॉम लॅथमने 15 आणि विल यंगने 33 धावा केल्या. कॉनवे आणि लॅथम यांच्यात पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी झाली. यानंतर कॉनवेने दुसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली. तिन्ही फिरकीपटूंनी भारतासाठी आतापर्यंत सर्व विकेट घेतल्या आहेत. कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. याआधी न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 5 विकेट घेतल्या होत्या. युवा वेगवान गोलंदाज विल्यम ओ रुकीने चार बळी घेतले.


संबंधित बातमी:


Rohit Sharma Ind vs Nz 1st Test : 'माझी चूक झाली...' टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर कर्णधार रोहितने दिली कबुली