India vs New Zealand 1st Test Day 2 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी 16 ऑक्टोबर रोजी पावसामुळे नाणेफेक झाली नाही. अशा स्थितीत दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो लंचपर्यंत तरी चुकीचा ठरला. टीम इंडियाने अवघ्या 23.5 षटकांत 34 धावा केल्या असून सहा विकेट गमावल्या आहेत. 




बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका एकतर्फी जिंकणाऱ्या टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्धची अवस्था खूपच वाईट झाली. बेंगळुरूच्या खेळपट्टीवर भारतीय खेळाडू एकापाठोपाठ एक पॅव्हेलियनमध्ये परतताना दिसले. 34 धावांवर संघाने सहा विकेट गमावल्या. 55 वर्षांनंतर मायदेशात भारताची अशी वाईट परिस्थिती झाली आहे.


भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि सहाव्या षटकापासून एका मागे एक विकेट पडू लागल्या. परिस्थिती अशी होती की 10 धावांवर भारताने तीन विकेट गमावल्या होत्या. उपाहारापर्यंत विकेट्सची संख्या तीनवरून सहा झाली. 1969 नंतर भारतीय भूमीवर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारताने 34 धावांवर सहा विकेट गमावल्या. भारताने गमावलेली सर्वात कमी धावसंख्या 1969 मध्ये 6 विकेट्स 27 धावा केल्या होत्या. हैदराबादमध्ये झालेल्या त्या सामन्यातही भारताचा प्रतिस्पर्धी न्यूझीलंड होता.




सहापैकी चार फलंदाज खाते न उघडताच बाद झाले. विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांना खातेही उघडता आले नाही. सलामीवीर यशस्वी जैस्वालने 63 चेंडू खेळून संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला केवळ 13 धावा करता आल्या.  तर रोहित शर्मा 16 चेंडूत दोन धावा करून टीम साऊथीच्या गोलंदाजीवर बाद झाला. उपाहारापर्यंत ऋषभ पंत 15 धावा करून क्रीजवर आहे. न्यूझीलंडकडून विल्यम ओ'रुर्कने सर्वाधिक तीन बळी घेतले. मॅट हेन्रीला दोन आणि टीम साऊथीला एक विकेट मिळाली आहे.


हे ही वाचा -


IND vs NZ 1st Test Virat Kohli : शून्यावर आऊट, तरीही कोहलीचा मोठा विक्रम; MS धोनीला मागे टाकले!


Ind vs NZ 1st Test : गंभीरची रणनीती फसली! रोहित 2, विराट-0, सरफराज-0, पहिल्या 10 षटकात टीम इंडियाची बत्ती गुल?