India vs England Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम कसोटी रद्द करण्यात आली. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मँचेस्टर कसोटीच्या एक दिवस आधी भारतीय संघाचा ज्युनिअर फिजिओ देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यानंतर टीम इंडियाने पाचवी टेस्ट खेळण्यास नकार दिला. मालिकेत भारताची 2-1 अशी आघाडी आहे, परंतु अंतिम कसोटी रद्द झाल्यानंतर मालिकेच्या निकालाबाबत बरीच चर्चा आहे. सध्या क्रिकेट तज्ज्ञांपासून क्रिकेट पंडितांपर्यंत या मालिकेचा काय परिणाम होईल, याची कल्पना नाही.
आधी ईसीबीने आपल्या निवेदनात Forfeit हा शब्द वापरला होता. इंग्लिश बोर्डाने म्हटले होते की भारताने सामना सोडला आणि मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. पण काही वेळानंतर त्यांनी आपलं निवेदन बदलले आणि सामना रद्द करण्याचे सांगितले. दुसरीकडे, बीसीसीआयने सातत्याने सांगितले होते की त्यांनी सामना सोडला नाही आणि ते कधीही हा सामना खेळण्यास तयार आहेत. भारतीय मंडळाने असेही म्हटले होते की दोन्ही बोर्ड आता हा सामना खेळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मालिकेचा निकाल कसा येऊ शकतो?
या मालिकेचा निकाल आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) हातात आहे. जर आयसीसीने निर्णय घेतला की भारताने कोरोनामुळे हा सामना खेळला नाही, तर तो सामना रद्द मानला जाईल आणि भारताला 2-1 ने मालिकेत विजय घोषित केला जाईल. पण जर भारताने हा सामना सोडला असे आयसीसीला वाटत असेल तर पाचव्या कसोटीत इंग्लंडला विजय मिळवून मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली जाईल.
India Vs England : रद्द झालेली कसोटी पुन्हा खेळवण्याचा बीसीसीआयचा इग्लंड क्रिकेट बोर्डाकडे प्रस्ताव
आयसीसीचे नियम काय म्हणतात?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी तयार केलेल्या आयसीसीच्या नियमांनुसार, एखादा संघ कोरोना केसेसमुळे कोणताही सामना खेळण्यास नकार देऊ शकतो. मात्र हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा एखाद्या संघात कोरोना केसेस असतील आणि नंतर तो संघ प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरण्यास सक्षम नसेल. पण भारताच्या बाबतीत असे झाले नाही. भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूला कोरोनाची लागण झाली नाही आणि सामन्यापूर्वी सर्व खेळाडूंचा आरटी-पीसीआर अहवालही निगेटिव्ह आला. आता हे पाहणे औत्सुक्याचं असेल की आयसीसी टीम इंडियाच्या कोरोनामुळे सामना न खेळण्याच्या निर्णयाला वैध कारण मानते की नाही.