मुंबई : पुढच्या महिन्यापासून संयुक्त अरब अमिरात आणि ओमनमध्ये सुरु होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2021) अफगाणिस्तानच्या संघाची घोषणा होताच राशिद खानने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. निवड समितीने संघ निवडताना कर्णधार म्हणून आपला सल्ला घेतला नसल्याचं कारण देत त्याने राजीनामा दिला होता. राशिद खानच्या राजीनाम्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने आता संघाच्या कर्णधारपदी मोहम्मद नबी याची नियुक्ती केली आहे.
मोहम्मद नबी हा अफगाणिस्तानचा वरिष्ठ खेळाडू असून त्याला एकदिवसीय तसेच टी 20 सामने खेळण्याचा अनुभव आहे. मोहम्मद नबी हा आयपीएलमध्ये हैदराबाद सनरायझर्स या संघाकडून खेळतो.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने निवडलेल्या संघावर राशिद खान नाराज असून संघाची निवड करताना आपला सल्ला घेतला नसल्याचं त्याने म्हटलं आहे. राशिद खानने आपली नाराजी व्यक्त करताना म्हटलं आहे की, "कर्णधार आणि देशाचा एक जबाबदार व्यक्ती म्हणून मला संघाच्या निवडीच्या हिस्सा बनण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि निवड समितीने मला कोणताही सल्ला विचारला नाही. त्यामुळे मी तात्काळ प्रभावाने टी 20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. अफगाणिस्तानच्या संघाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे."
राशिद खान हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जात असून तो टी 20 मधील जगातील तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. राशिद खान आयपीएलमध्ये हैदराबाद सनरायझर्स या संघाकडून खेळतो.
आयसीसी टी 20 विश्वचषक सामने 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान संयुक्त अरब अमिरात आणि ओमनमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.
असा असेल अफगाणिस्तानचा संघ
मोहम्मद नबी (कर्णधार), राशिद खान, रहमानुल्लाह गुरबाज, हजरतुल्लाह जजई, उस्मान गनी, असगर अफगान, नजीबुल्लाह जादरान, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जानत, गुलबदीन नायब, नवीन उल हक, हामिद हसन, दौलत जदरान, शरफुद्दीन अशरफ, शापूर जादरान, कैस अहमद.
संबंधित बातम्या :
- Rashid Khan : राशिद खानचा अफगाणिस्तान क्रिक्रेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा; संघ निवडीमध्ये स्थान न दिल्याने निर्णय
- Australia vs Afghanistan: अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचा दणका, महिला क्रिकेटवर बंदी आणाल तर...
- Dhoni in T20 World Cup : आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी महेंद्र सिंह धोनीकडे मोठी जबाबदारी