India vs England 2nd T20: भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिकेच्या सुरुवातीच्या सामन्यातच भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनीही या सामन्यात क्रीडारसिकांना नाराज केलं. आज विराट सेना दुसऱ्या टी20 मध्ये विजयाच्या निर्धारानं उतरणार आहे. तर इंग्लंडचा संघ कसोटी मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. भारतीय टीम पहिल्या सामन्यात रोहित शर्मा विना मैदानात उतरली होती. तसेच संघात तीन फिरकी गोलंदाजांना स्थान दिलं होतं. आता या दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया संघात काही बदल करु शकते. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ पहिल्या सामन्यातील प्लेईंग इलेव्हन कायम ठेवण्याची शक्यता आहे.
एकमेकांसमोर दोन्ही संघ तुल्यबळ
टी20 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड एकमेकांविरोधात 15 सामने खेळले आहेत. यातील आठ सामन्यात इंग्लंडनं बाजी मारली आहे तर भारतानं सात सामने जिंकले आहेत. भारतीय भूमिवर इंग्लंडनं सात सामने खेळले आहेत, त्यातील चार सामने जिंकले आहेत.
देव संन्यास घेत नसतो; सचिन तेंडुलकरचं तुफानी अर्धशतक पाहून क्रीडारसिक भारावले
रोहित परतणार का?
दुसऱ्या टी20 मध्ये देखील केएल राहुल आणि शिखर धवन सलामीला येऊ शकतात. उपकर्णधार रोहित शर्माला आज देखील विश्रांती दिली जाऊ शकते. या सामन्यात तीन वेगवान गोलंदाजांसह टीम इंडिया उतरु शकते. असं झालं तर अक्षर पटेलच्या जागी दीपक चहर, नवदीप सैनी किंवा टी नटराजनला संधी मिळू शकते.
असा असू शकतो भारतीय संघ
भारतीय टीम- शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर/नवदीप सैनी.
इंग्लंड संभावित प्लेईंग इलेव्हन
इंग्लंड टीम- जेसन रॉय, जोस बटलर (विकेटकीपर), डेविड मलान, जॉनी बेयरस्टो, इयोन मोर्गन (कप्तान), बेन स्टोक्स, सॅम कर्रन, आदिल रशीद, क्रिस जॉर्डन, मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर.