मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खेळपट्टीवर असणारा वावर म्हणजे क्रीडारसिकांसाठी एक पर्वणीच. तो आला... त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं अशीच काहीशी कामगिरी सचिननं सध्या सुरु असणाऱ्या road safety world series मालिकेमध्ये केली. 


साऊख आफ्रिका लेजेंड्स अर्थात दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाला भेदत सचिन तेंडुलकरनं इंडिया लेजेंड्स संघाच्या वतीनं दमदार फलंदाजी केल्याचं पाहायला मिळालं. 


क्रिकेटच्या मैदानात ज्या शॉट्ससाठी सचिन ओळखला जातो, असेच काहीसे शॉट्स या सामन्याच्या निमित्तानं क्रीडारसिकांना पाहता आलं. अवघ्या 30 चेंडूंमध्ये सचिननं अर्धशतकी खेळी पूर्ण केली. तर, एकूण 37 चेंडूंमध्ये त्यानं 60 धावा केल्या. 


 Ind vs Eng | पहिल्याच टी20 सामन्यात विराटच्या नावे लाजिरवाणा विक्रम 


सचिनची ही तुफानी कामगिरी पाहून समालोचकांचा उत्साहसुद्धा गगनात मावेनासा झाला होता. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूचा तोच गाजलेला फॉर्म पुन्हा पाहायला मिळाल्यामुळं देव कधीच संन्यास घेत नसतो अशा शब्दांत समालोचकांनी सचिनची प्रशंसा केली. दक्षिण आफ्रिका संघातील जोडेंकीनं 13 व्या षटकात सचिनला झेलबाद केलं. यापूर्वी त्यानं बद्रीनाथसह मैदानात 95 धावांची भागिदारी केली होती.