पुणे : पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 336 धावांचा डोंगर इंग्लंडपुढे उभारला होता. असे वाटत होते की इंग्लंडला 337 धावांचे कठीण लक्ष्य साध्य करण्यात अडचण येऊ शकते. परंतु, जॉनी बेअरस्टोच्या शानदार शतकामुळे आणि बेन स्टोक्सच्या 99 धावांच्या जोरदार खेळीमुळे इंग्लंडला हे लक्ष्य सहज गाठता आले.
नियमित कर्णधार मॉर्गनच्या अनुपस्थितीत इंग्लंड जोस बटलरच्या नेतृत्वात उतरला होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रण दिले. मात्र, भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन केवळ 4 धावांवर तंबूत परतला. रोहित शर्माही 25 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार कोहली आणि केएल राहुल यांनी शतकी भागीदारी करत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवले. कोहलीने 66 धावा केल्या तर राहुलने शानदार शतक ठोकले. यानंतर ऋषभ पंतने 77 धावा केल्या आणि हार्दिक पांड्यानेही 35 धावा केल्या.
प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव संथ सुरू झाला. जेसन रॉयने अर्धशतक ठोकले. रोहितच्या शानदार फिल्डिंगमुळे रॉय धावबाद होता. यानंतर बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी सामना पूर्णपणे एकतर्फी बनवला. बेन स्टोक्सने 10 षटकार लगावले. जॉनी बेअरस्टोने शतक ठोकले. मात्र, बेन स्टोक्सने 99 धावांच्या खेळीवर कृष्णाचा बळी ठरला. डावाच्या 44 षटकांमध्येच विजयासाठी आवश्यक 337 धावा करुन इंग्लंडने हा सामना एकतर्फी जिंकला.
या संपूर्ण सामन्यात भारताची गोलंदाजी सुमार झाली. भारत कधीही सामन्यात विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे वाटले नाही. गोलंदाज विकेटसाठी तळमळताना दिसले. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव आणि कृणाल पंड्या अत्यंत महागडे ठरले. तीन सामन्यांची ही मालिका आता 1-1 अशी झाली आहे. तिसरा सामनाही पुण्यात खेळला जाईल. अंतिम सामन्यात मालिकेचा विजेता कोण असेल हे निश्चित होईल.