Ind vs Aus, India Gabba Test Win Historic : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ब्रिस्बेनमध्ये 33 वर्षांपासून कधीही पराभूत झालेला नव्हता आणि भारताविरुद्ध गाबाच्या मैदानात एकही सामना गमावलेला नव्हता. परंतु अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केलं. भारताने ही कसोटी तीन विकेट्सनी जिंकली.
ऑस्ट्रेलियन संघासाठी ब्रिस्बेनचं गाबा मैदान एखाद्या किल्ल्यापेक्षा कमी नाही. ऑस्ट्रेलियाला त्या मैदानात पराभूत करणं अशक्य असल्याचं म्हटलं जातं होतं. कारण 1988 पासून ऑस्ट्रेलियाचा संघ या मैदानात कधीही पराभूत झालेला नव्हता. शिवाय सुरुवातीला क्वॉरन्टीनमुळे जेव्हा भारतीय संघाने इथे खेळण्यास नकार दिला होता, त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी म्हटलं होतं की, ऑस्ट्रेलियाची ब्रिस्बेनमधली कामगिरी शानदार आहे, त्यामुळेच भारतीय संघाला इथे खेळायचं नाही. परंतु रहाणेच्या नेतृत्त्वातील भारताच्या युवा संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून त्यांची 'घमेंड' उतरवली.
IND vs AUS, India Wins Gabba Test | ब्रिस्बेन कसोटी भारताने जिंकली, बॉर्डर-गावस्कर मालिकाही खिशात
गाबामधील ऑस्ट्रेलियाची कामगिरी आजच्या सामन्याआधी गाबामध्ये ऑस्ट्रेलियाचा शेवटचा पराभव नोव्हेंबर 1988 मध्ये झाला होता. विव रिचर्ड्स यांच्या वेस्ट इंडीज संघाने ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेट्सनी पराभव केला होता. त्यानंतर गाबाच्या मैदानात 31 कसोटी सामने खेळवण्यात आले. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 24 सामन्यात विजय मिळवला आणि 7 सामने अनिर्णित राहिले. परंतु 19 जानेवारी 2021 हा दिवस ऑस्ट्रेलियाच्या गर्वहरणाचा ठरला.
गाबामधील भारताची कामगिरी तर आजच्या सामन्यापूर्वी गाबामध्ये भारतीय संघाने एकूण सहा सामने खेळले होते. त्यापैकी पाच सामन्यात भारताचा पराभव झाला होता तर एक सामना अनिर्णित राखण्यात भारताला यश आलं होतं. मात्र आजच्या दिवशी भारताने गाबामध्ये ऐतिहासिक विजयाची नोंदवला आणि ऑस्ट्रेलियाचा बुरुज ढासळला.