India vs Bangladesh 1st T20I : कसोटी मालिकेनंतर बांगलादेशला भारतीय भूमीवर टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातही दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. यासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 


टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने स्फोटक खेळी खेळली आणि शानदार षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. पदार्पणाच्या सामन्यात मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांनी छाप पाडली. तर 3 वर्षानंतर संघात पुनरागमन करणारा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीनेही धुमाकूळ घातला. युवा खेळाडूच्या या कामगिरीमुळे भारताने बांगलादेशला पराभवाची धुळ चारली.




वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने बांगलादेशचा डाव 19.5 षटकांत 127 धावांत गुंडाळला. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराझने 32 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 35 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप आणि वरुणने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या, तर नवोदित मयांक यादव, अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


अर्शदीपने बांगलादेशला सुरुवातीला दोन धक्के दिले ज्यातून संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही आणि त्याची फलंदाजी खूपच खराब झाली. तीन वर्षांनंतर भारतीय टी-20 संघात पुनरागमन करताना वरुणने छाप सोडली, तर अर्शदीपनेही घातक गोलंदाजी करत बांगलादेशला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. मयंक यादवने आपल्या टी-20 कारकिर्दीतील पहिले षटक टाकले आणि एक विकेट घेण्यातही तो यशस्वी ठरला. एकूणच या सामन्यात भारतीय गोलंदाजी उत्कृष्ट होती.


प्रत्युत्तरात भारतीय संघाने 11.5 षटकांत तीन गडी गमावून 132 धावा करून सामना जिंकला. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने 14 चेंडूत 29 धावा केल्या आणि संजू सॅमसनने 19 चेंडूत 29 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 16 चेंडूत नाबाद 39 धावांची तुफानी खेळी खेळली, तर नितीश कुमार रेड्डी याने पदार्पण सामना खेळताना 15 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या. बांगलादेशसाठी एकही गोलंदाज छाप सोडू शकला नाही. मुस्तफिजुर रहमान आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.


हे ही वाचा -


Harmanpreet Kaur Injury : टीम इंडियाचे स्वप्न भंगणार?, पाकिस्तानला हरवण्यापूर्वी कर्णधार हरमनप्रीतने रडत सोडले मैदान, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण


IND vs BAN : स्पीड गन मयंक यादवची तुफानी एन्ट्री! आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील घेतली पहिली विकेट, कुणाची केली शिकार?