India vs Australia, T20 World Cup 2024 : रोहित शर्माच्या वादळी 92 धावांच्या बळावर भारताने 20 षटकात 5 विकेटच्या मोबदल्यात 206 धावांचा डोंगर उभारलाय. ऑस्ट्रेलियासाठी करो या मरो सामन्यात विजयासाठी 206 धावांचे आव्हान मिळाले आहे. रोहित शर्माच्या वादळी 92 धावांशिवाय सूर्या, दुबे आणि हार्दिक पांड्या यांनीही झंझावाती फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाची तगडी गोलंदाजी भारतासमोर सपशेल फेल ठरली.


रोहित शर्माची वादळी फलंदाजी, 8 धावांनी शतक हुकले 


पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क ही जगातील सर्वात भेदक गोलंदाजी रोहित शर्माने फोडून काढली. रोहित शर्मापुढे ऑस्ट्रेलियाची बलाढ्य गोलंदाजी कमकुवत दिसली. रोहित शर्माने 41 चेंडूमध्ये 92 धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी करत भारताची धावसंख्या वाढवली. रोहित शर्माच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारताने सर्वात वेगवान 100 धावांचा पल्ला पार केला. भारताने फक्त 8.4 षटकात शतक फलकावर लागले होते. टी20 विश्वचषकातील सर्वात वेगवान 100 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही, त्याच्यापुढे सर्व गोलंदाजी फिकी दिसून आली. 


टीम इंडियाच्या 52 धावा झाल्या होत्या, तेव्हा रोहित शर्माने आपलं अर्धशतक पूर्ण केले होते. विराट कोहली दुसर्‍याच षटकात शून्यावर बाद झाला. त्यानंतरही रोहित शर्माची बॅट तळपळतच राहिली. रोहित शर्माने 41 चेंडूमध्ये 92 धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने आपल्या वादळी खेळीमध्ये 8 षटकार आणि सात चौकार ठोकले. रोहित शर्माने स्टार्कच्या एकाच षटकात 4 षटकार ठोकत 29 धावा वसूल करत हवा काढली होती.  रोहित शर्मापुढे ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले होते. रोहित शर्माचे शतक फक्त आठ धावांनी हुकले.


विराट कोहली पुन्हा फ्लॉप 


टी20 विश्वचषकात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाविरोधात विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. जोश हेजलवूड याने विराट कोहलीला भोपळा फोडू दिला नाही. या विश्वचषकात विराट कोहलीला अद्याप एकही अर्धशतक ठोकता आले नाही. त्याची सर्वोच्च धावसंख्या 37 इतकी राहिली आहे. 


विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत यालाही ऑस्ट्रेलियाविरोधात मोठी खेळी करता आली नाही. पंतला 14 चेंडूमध्ये फक्त 15 धावा करता आल्या. यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. स्टॉयनिसने पंतला तंबूत धाडले. 


सूर्याची झंझावाती फलंदाजी, दुबेची छोटेखानी खेळी


सूर्यकुमार यादवयाने 31 धावांची छोटेखानी खेळी केली. त्यानं फक्त 16 चेंडूमध्ये दोन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 31 धावांचा पाऊस पाडत धावसंख्या वाढवली. 


सूर्यकुमार बाद झाल्यानंतर शिवम दुबेही तंबूत परतला. शिवम दुबे याला चांगली सुरुवात मिळाली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. दुबे यानं 22 चेंडूमध्ये एक षटकार आणि दोन चौकाराच्या मदतीने 25 धावांचे योगदान दिले.


हार्दिक पांड्याचा फिनिशिंग टच


हार्दिक पांड्याने वादळी फलंदाजी करत टीम इंडियाला फिनिशिंग टच दिला. हार्दिक पांड्याने 17 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि एक चौकार ठोकला. रवींद्र जाडेजाने पाच चेंडूमध्ये 9 धावांचे योगदान दिले, त्यामध्ये एक षटकार ठोकला.


ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी  


ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूड याचा अपवाद वघलता एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. हेजलवूड याने चार षटकात फक्त 14 धावा खर्च करत एक विकेट घेतली.  मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, स्टॉयनिस, कमिन्स हे सर्व गोलंदाज महागडे ठरले. स्टार्कने चार षटकात 45 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. स्टॉयनिसने चार षटकात 56 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्या.


पॅट कमिन्सने चार षटकामध्ये 48 धावा खर्च केल्या. त्याशिवाय अॅडम झम्पा याने 4 षटकात 41  धावा दिल्या. पॅट कमिन्स आणि झम्पा यांच्या विकेटची पाटी कोरीच राहिली.