Ind Vs Aus T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सेंट ल्युईस येथे होत असलेला हा ऑस्ट्रेलियासाठी आजचा करो या मरो असा आहे. सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे बलाढ्य ऑस्ट्रेलियावर स्पर्धेबाहेर जाण्याची वेळ आली आहे. 


ऑस्ट्रेलियाच्या संघात एक बदल -


मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेईंग 11 मध्ये एक बदल केलाय. एश्टन एगर याला आराम देण्यात आला असून डावखुऱ्या मिचेल स्टार्क याला संधी देण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे डावखुऱ्या गोलंदाजाविरोधात चाचपडतात, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने स्टार्कला खेळवण्याचा निर्णय घेतला असेल. दुसरीकडे भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आलाय.


भारतीय संघाची प्लेईंग 11


रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह


ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण ?


ट्रेव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेश मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जॉश हॅजलवूड


रोहित शर्मा वचपा काढणार का ?


ऑस्ट्रेलियाचा पराभव करत टीम इंडिया विश्वचषकाच्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. 2023 वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत स्वप्नाचा चक्काचूर केला होता. त्याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. या दोन पराभवाची सल आजही भारतीयांच्या मनात आहेच, त्यामुळे रोहित शर्मा आणि टीम आज ऑस्ट्रेलियाला धूळ चारत वचपा काढण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. 


हेड टू हेड काय स्थिती ?


भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ टी-20 त आतापर्यंत 31 वेळा आमने-सामने आला आहे. यामध्ये भारताने 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाला 11 सामन्यात विजय मिळवण्यात यश  आले आहे. एक सामना अनिर्णित राहिला. तर टी-20 विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे एकूण 5 सामने झाले. यामध्ये 4 सामने भारताने, तर 1 सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे.