IND vs AUS T20 Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आयसीसी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) स्पर्धेपूर्वी तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडणार आहे. दोन्ही संघासाठी विश्वचषकापूर्वी ही एक महत्त्वाची सराव मालिका असणार आहे. दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या टी20 सामन्यांमध्ये जगातील अव्वल दर्जाचे खेळाडू आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघातील काही खेळाडूंवर सर्व क्रिकेट जगताच्या नजरा असणार आहेत. यावेळी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा असणारे काही खेळाडू कोणते ते पाहूया....
टीम डेव्हिड
भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघात एक नवा खेळाडू मैदानात उतरेल. हा खेळाडू म्हणजे आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये दमदार कामगिरी केलेला टीम डेव्हिड (Tim David). त्याने आतापर्यंत सिंगापूरसाठी 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून आता तो ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.टीम त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. टी-20 मध्ये त्याची सरासरी 46.50 इतकी आहे. त्याच वेळी, त्याचा स्ट्राईक रेट देखील 158 इतका राहिला आहे. टीम डेव्हिडची तुलना भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याशीही केली जाते.
ग्लेन मॅक्सवेल
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात स्फोटक आणि धोकादायक फलंदाज मानला जातो. विशेषतः मॅक्सवेलला भारताविरुद्ध आणि भारतात खेळायला आवडत असल्यानं आयपीएलही त्यानं गाजवली आहे. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेत तो मोठा बदल घडवू शकतो. मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 87 टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 30.56 च्या सरासरीने 2 हजार 17 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 154 राहिला आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये तीन शतकंही झळकावली आहेत.
पॅट कमिन्स
ऑस्ट्रेलियन टी-20 संघाचा उपकर्णधार आणि मुख्य गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummines) जगातील अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत तो आपल्या वेगवान चेंडूंनी भारतीय फलंदाजांना अडचण ठरु शकतो. आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी त्याने 39 टी-20 सामने खेळत 44 विकेट्स घेतल्या आहेत. पॅट हा फलंदाजीतही वेळप्रसंगी कमाल करु शकतो.
स्टीव्ह स्मिथ
ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार आणि जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असलेला स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) भारताविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियासाठी मोठा धोका बनू शकतो. त्याचा भारताविरुद्धचा रेकॉर्ड दमदार आहे. स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 57 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 26.51 च्या सरासरीने 928 धावा केल्या आहेत. स्मिथने विकेट्सवर टिकून राहिल्यास भारतासाठी अडचण होऊ शकते.
कॅमेरून ग्रीन
ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन (cameron green) भारताविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघासाठी ट्रम्प कार्ड ठरु शकतो. तो ऑस्ट्रेलियाचा एक महत्त्वाचा आणि भरवशाचा आश्वासक युवा खेळाडू आहे. मागील काही काळापासून त्याची कामगिरीही चांगली झाली आहे. अशा स्थितीत भारताविरुद्धच्या मालिकेत तो भारतीय संघासाठी मोठं आव्हान असणार आहे.
कसे आहेत दोन्ही संघ?
ऑस्ट्रेलिया संघ -
आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.
भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, दीपक चाहर.
हे देखील वाचा-