Babar Azam, Mohammed Siraj : अहमबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर बाबर आझम याने चिवट फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली आहेत. भारत आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठी एक लाखांपेक्षा जास्त चाहते आले आहेत. बाबर आझम याने भारताच्या गोलंदाजीचा संयमी सामना करत पाकिस्तानची धावसंख्या हालती ठेवली. बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांनी अर्धशथकी भागिदारी करत पाकिस्तानचा डाव सावरला. ही जोडी धोकायदायक होतेय, असे वाटत असतानाच सिराजने कमाल केली. मोहम्मद सिराजने बाबर आझम याला त्रिफाळाचीत बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. बाबर आझम 50 धावांवर बाद झाला. बाबरची ही भारताविरोधातील आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी होय. 


बाबर आझम याने वनडे क्रिकेटमध्ये भारताविरोधात पहिले अर्धशतक ठोकले. आतापर्यंत बाबरला एकाही भारताविरोधात मोठी खेळी करता आली नव्हती. त्याची सर्वोच्च धावंसख्या 48 होती. 2019 च्या विश्वचषकात त्याने 48 धावांची खेळी केली होती. त्यावेळी त्याचा अडथळा कुलदीप यादव याने दूर केला होता. आता सिराजने अप्रतिम चेंडूवर बाबरला तंबूत पाठवले. पण तोपर्यंत बाबर आझम याने आपले काम केले होते. जवळपास एक लाख भारतायींसमोर बाबरने अर्धशतक ठोकले. 


बाबर आझम याने 58 चेंडूमध्ये सात चौकारांच्या मदतीने 50 धावांची खेळी केली. कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा या धोकादायक फिरकीचा त्याने संयमी सामना केला, पण सिरजला विकेट दिली.   










भारताविरोधात बाबरची कामगिरी -


बाबर आझम याने पाकिस्तानसाठी खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. 107 वनडे डावात बाबरने 57 च्या सरासरीने 5424 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये बाबर आझम याने आतापर्यंत 19 शतके आणि 28 अर्धशतके ठोकली आहेत. पण  भारताच्या गोलंदाजीसमोर बाबर संघर्ष करताना पाहायला मिळतो. आशिया चषकात झालेल्या सामन्यात बाबर आझम फक्त दहा धावा काढून बाद झाला होता. अहमदाबादच्या सामन्यापूर्वी भारताविरोधात सहा एकदिवसीय सामन्यात बाबर आझम याला 30 च्या सरासरीने फक्त 168 धावा करता आल्यात. भारताविरोधात बाबर आझमची सर्वोच्च धावसंख्या 48 इतकी आहे.


भारताविरोधात वनडेमध्ये बाबरची कामगिरी कशी राहिली ?


2017 चॅम्पियन ट्रॉफी- 8 धावा


2017 चॅम्पियन ट्रॉफी- 46 धावा


2018 आशिया कप- 47 धावा


2018 आशिया कप- 9 धावा


2019 वर्ल्ड कप- 48 धावा


2023 आशिया कप - पावसामुळे सामना रद्द झाला


2023 आशिया कप - 10 धावा


विश्वचषकाच्या पहिल्या दोन्ही सामन्यात बाबर आझम फ्लॉप - 


विश्वचषकातील पहिल्या दोन्ही सामन्यात पाकिस्तान संघाने विजय मिळवला. श्रीलंका आणि नेदरलँड यांच्याविरोधात पाकिस्तान संघाने बाजी मारली. पण या दोन्ही सामन्यात बाबर आझमला मोठी खेळी करता आली नाही. दोन्ही सामन्यात बाबर आझमची बॅट शांतच राहिली. नेदरलँडच्या विरोधात बाबर आझम 5 धावा काढून तंबूत परतला होता. तर श्रीलंकाविरोधात 10 धावा काढून तंबूत परतला.