अहमदाबाद : वर्ल्डकपमधील (ICC Cricket World Cup 2023) हायहोल्टेज सामन्यात 2 बाद 155 दमदार धावसंख्या उभारणाऱ्या पाकिस्तानचा डाव कर्णधार बाबर आझम बाद झाल्यानंतर अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. जो संघ भारतासमोर दमदार आव्हान उभा करेल असं वाटत असतानाच भारतीय गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानचा डाव अवघ्या 191 धावांमध्ये आटोपला. अवघ्या 13 षटकांत आठ विकेट गमावताना पाकिस्तानने केवळ 36 धावा करता आल्या. 


पाकिस्तानसाठी कुलदीप कर्दनकाळ 


पाकिस्तानच्या फलंदाजीला खऱ्या अर्थाने सुरुंग लावला असेल तर तो शांतीत क्रांती करणाऱ्या कुलदीप यादवने (Kuldeep Yadav against Pakistan in ODIs) लावला. त्याने एका षटकात दोन बळी घेतल्यानंतर पाकिस्तानचा डाव शेवटपर्यंत सावरलाच नाही. कुलदीपची ही कामगिरी आजचीच नसून 2019 च्या वर्ल्डकपमध्येही त्याने दोन विकेट घेत पाकिस्तानला अडचणीत आणले होते. पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या 5 सामन्यांची आकडेवारी पाहिल्यास कुलदीप यादव हा पाकिस्तानसाठी कर्दनकाळ राहिला आहे. मागील पाच सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना कुलदीपने 12 विकेट घेतल्या आहेत.  






दुसरीकडे, जो पाकिस्तान कधीकधी गेलेला सामना खेचून आणण्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच हातात आलेला सामना गमावण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आज मात्र त्यांनी कमावलेली सर्व स्थिती अवघ्या काही चेंडूंमध्ये गमावली. पाकिस्तानच्या मधल्य फळीतील हसन अलीच्या फक्त बारा धावांचा अपवाद वगळता कुठलाच फलंदाज दोन आकडी धावसंख्या सुद्धा करू शकला नाही. त्यामुळे पाकिस्तानला दमदार सुरुवात करूनही मोठी धावसंख्या उभारता आली नाही.






बाबर आझमने 50 धावा केल्या, तर मोहम्मद रिझवानने 49 धावा केल्या. कुलदीपच्या फिरकीने पाकिस्तानला पूर्णतः बॅकफूटवर टाकले. भारताकडून मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेत पाकिस्तानचा डाव संपुष्टात आणला. बुमराहची गोलंदाजी सर्वाधिक घातक राहिली. सात षटकांमध्ये एक ओव्हर निर्धाव टाकताना 19 धावा देत दोन विकेट घेतल्या. 






इतर महत्वाच्या बातम्या