India tour of Zimbabwe: भारतानं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा 5 विकेट्सनं (ZIM vs IND) पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या विजयानंतर भारतीय संघ (Team India) पाकिस्तानच्या विश्वविक्रमाच्या अगदी जवळ पोहचलाय. झिम्बाब्वेविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. त्यानंतर या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या या विश्वविक्रमाशी बरोबरी साधण्यापासून भारत फक्त एक विजय दूर आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतानं 53 वेळा विजय मिळवलाय. तर, पाकिस्ताननं 54 वेळा झिम्बाब्वेच्या संघाला धुळ चारली आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात उद्या म्हणजेच 22 ऑगस्ट 2022 रोजी मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेला हरवल्यास पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी करेल. या यादीत बांग्लादेश 51 विजयासह तिसऱ्या आणि श्रीलंकेचा संघ 46 विजयासह चौथ्या स्थानावर आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकणारा संघ:
संघ | विजय |
पाकिस्तान | 54 |
भारत | 53* |
बांग्लादेश | 51 |
श्रीलंका | 46 |
भारताचा पाच विकेट्सनं विजय
झिम्बाब्वेनं दिलेल्या 162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला पहिला धक्का कर्णधार केएल राहुलच्या रुपात पहिला झटका बसला. या सामन्यात केएल राहुलला फक्त एक धाव करता आली. त्यानंतर धवन आणि गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 29 चेंडूत 42 धावांची भागीदारी केली. मात्र, 21 चेंडूत 33 धावा करून धवन बाद झाला. त्यानंतर इशान किशनही 6 धावा करून बाद झाला. गिलही 34 चेंडूत 33 धावा केल्यानंतर काही वेळानं बाद झाला. दरम्यान, संजू सॅमसननं झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर दबाव कायम ठेवत भारताला सामना जिंकून दिला.
मालिकेवर भारताचा कब्जा
झिम्बाब्वेविरुद्ध सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं झिब्बावेच्या संघाला 10 विकेट्सनं पराभूत केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाच विकेट्सनं विजय मिळवत मालिकेकवर कब्जा केलाय. या मालिकेतील तिसरा सामना औपचारिकता म्हणून खेळला जाईल, जो 22 ऑगस्ट रोजी हेरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जाईल.
हे देखील वाचा-