Kiran Navgire : क्रिकेट विश्वात महेंद्रसिंह धोनी याने आपल्या फटकेबाजीने खास ओळख तयार करून ठेवली होती. सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील मिरे गावाची किरण नवगिरे ही देखील अशाच पद्धतीने तुफान फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच तिची इंग्लंड दौऱ्यात भारतीय टी 20 संघात निवड करण्यात आली आहे.  


मिरे सारख्या अतिशय लहानशा गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या  किरण प्रभु नवगिरे ही पहिल्यापासून विविध खेळात पारंगत होती. मात्र तिचा विशेष ओढा कायमच क्रिकेटकडे राहिला होता . आता सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी तिला भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. या दौऱ्यात 3 टी-20 व 3 एकदिवसीय सामने खेळले जाणारआहेत.  दहा सप्टेंबरपासून या स्पर्धा सुरू होणार असून या अगोदर अनघा देशपांडे हिची भारतीय महिला संघात निवड झालेली  होती त्यानंतर  आता सोलापूर जिल्ह्यांमधून किरण प्रभू नवगिरे  ही दुसरी महिला खेळाडू ठरली आहे. किरण हिने आपल्या फटकेबाजीतून देशातील क्रिकेट रसिकांची मने जिंकली होती. आता ती आंतरराष्ट्रीय स्पर्धात भारताचे नाव उज्वल करण्यासाठी खेळणार आहे. 


यापूर्वी  किरण हिने केवळ 84 चेंडूतच 209 धावा फटकावल्या होत्या . तिने महाराष्ट्राच्या महिला रणजी क्रिकेट संघात 2017 व 2018 मध्ये स्थान मिळवले होते. तेव्हा आर्थिक अडचणीमुळे तिला अकलूज येथील सावी फाउंडेशनच्या अध्यक्षा सविता व्होरा यांनी तिला सर्वतोपरी  मदत व आधार दिला. तिला बारामती येथील कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवले होते. किरण नवगिरेने महिला क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. त्यापैकी सीनियर महिलांच्या टी-20 सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम.नागालँडकडून खेळताना तिने अरुणाचल प्रदेशविरुद्ध 76 चेंडूत 162 धावा कुटल्या  होत्या. टी-20 प्रकारात 150 हून अधिक धावा करणारी ती भारताची पहिलीच खेळाडू ठरली होती.


किरणने पुण्यात एका देशांतर्गत स्पर्धेत खेळताना अवघ्या 25 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले होते. हे स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. यापूर्वी हा पराक्रम शेफाली वर्माच्या नावावर होता.तो किरणे मोडीत काढला. देशाचे नाव रोशन करून,  क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीसारखे विश्वविक्रम करण्याचा तिचा मानस आहे. तिच्या या सर्व प्रगतीसाठी तिचे आई-वडील प्रशिक्षक गुलजार शेख, मदत करणारे प्रोत्साहन देणारे मित्र, शिक्षक यांचा मोठा वाटा असल्याचे किरण सांगते. 


अशी असेल T20 टीम : हरमनप्रीत कौर (कप्तान), स्मृति मंधाना (वीसी), शैफाली वर्मा, दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमा रोड्रिग्स, स्नेह राणा, रेणुका सिंह, मेघना सिंह, राधा यादव, एस मेघना, तानिया
भाटिया (विकेटकीपर), राजेश्वरी गायकवाड़, दयालन हेमलता, सिमरन दिल, बहादुर, ऋचा घोष (wk), किरण प्रभु नवगीरे.