IND vs PAK in Asia Cup 2022 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळेच दोन्ही देश क्रिकेटच्या मैदानावर फक्त आयसीसीच्या स्पर्धेमध्येच भिडतात. आता आशिया चषकमध्ये कट्टर परंपरागत प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. आशिया चषकाचं नुकतेच वेळापत्रक जाहीर झाले आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गटामध्ये आहेत.
तबब्ल नऊ महिन्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटच्या मैदानावर सामना होणार आहे. 27 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होत आहे. 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यामध्ये सामना होणार आहे. दोन्ही देशातील क्रीडा रसिकांसोबत जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याची वाट पाहत आहे. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक दोन नव्हे तीनवेळा सामना होऊ शकतो.. पाहूयात कसं...
भारत आणि पाकिस्तान एकाच गटामध्ये असल्यामुळे पहिल्या फेरीमध्ये दोन्ही संघाचा सामना होणार आहे. त्यानंतर सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होण्याची शक्यता आहे. कारण, दोन्ही गटामधील प्रत्येकी दोन दोन संघ सुपर 4 साठी पात्र ठरणार आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही अ गटात आहेत. आणि जर हे दोघे त्या गटातील अव्वल दोन संघ राहिले, जी एक शक्यताही आहे, तर 4 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा त्यांच्यात सामना होऊ शकतो. भारत आणि पाकिस्तानच्या गटामध्ये असणारा तिसरा संघ कमकुवत असल्यामुळे सुपर 4 मध्ये भारत पाकिस्तान पोहचण्याची शक्यता आहे.
तिसऱ्यांदा कधी?
आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तान संघ बलाढ्य मानले जातात. दोन्ही संघ विजयाचे दावेदार आहेत. तसेच श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांना कमी धरुन चालणार नाही. पण या संघाच्या तुलनेत भारत आणि पाकिस्तान संघाचे पारडे नक्कीच जड आहे. अलीकडच्या काळात या दोन्ही संघांची टी-20 फॉरमॅटमध्ये कामगिरीही दमदार राहिली आहे. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान संघ फायनलमध्ये पोहचण्याची शक्यता आहे. 11 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकाची फायनल होण्याची शक्यता आहे.
आशिया चषकाचं वेळापत्रक
सामना | दिवस | दिनांक | संघ | ग्रुप | ठिकाण |
1 | शनिवार | 27 ऑगस्ट | अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका | बी | दुबई |
2 | रविवार | 28 ऑगस्ट | भारत विरुद्ध पाकिस्तान | ए | दुबई |
3 | मंगळवार | 30 ऑगस्ट | बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान | बी | शारजाह |
4 | बुधवार | 31 ऑगस्ट | भारत विरुद्ध पात्र संघ | ए | दुबई |
5 | गुरुवार | 1 सप्टेंबर | श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश | बी | दुबई |
6 | शुक्रवार | 2 सप्टेंबर | पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ | ए | शारजाह |
7 | शनिवार | 3 सप्टेंबर | ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | शारजाह |
8 | रविवार | 4 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
9 | मंगळवार | 6 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 | सुपर 4 | दुबई |
10 | बुधवार | 7 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
11 | गुरुवार | 8 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
12 | शुक्रवार | 9 सप्टेंबर | ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
13 | रविवार | 11 सप्टेंबर | सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
दरम्यान, आशिया कप स्पर्धेत यजमान श्रीलंका संघासह भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशने आपले स्थान पक्के केलं आहे. तर, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, ओमान, हाँगकाँग आणि इतर संघात पात्रता फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत. या पात्रता फेरीतील विजेत्या संघाला आशिया कप स्पर्धेत संधी मिळणार आहे.