India Women vs Sri Lanka Women Harmanpreet Kaur PLAYER OF THE SERIES : भारताच्या महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत मालिका 3-0 खिशात घातली. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेवर 39 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 256 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरदाखल श्रीलंकेचा संघ 216 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताकडून पूजा वस्त्रकार आणि कर्णधार हरमनप्रीत यांनी अर्धशतकी खेळी केली. तर  शेफाली वर्माने 49 धावांची निर्णायक खेळी केली. कर्णधार  हरमनप्रीत कौरने 75 धावा केल्या.  


भारतीय महिला संघाने गुरुवारी झालेल्या सामन्यात निर्धारित 50 षटकांत 9 विकेट्सच्या मोबदल्यात 255 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीतने 88 चेंडूत 75 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान हरमनप्रीतने सात चौकार आणि दोन षटकार लगावले. पूजा वस्त्रकार हिने 65 चेंडूत 56 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार लगावले. तर शेफाली वर्माने 50 चेंडूत निर्णायक 49 धावांची खेळी केली. यादरम्यान तिने पाच चौकार लगावले.  यास्तिका भाटिया हिनेही 30 धावांचं योगदान दिले. 


भारताने दिलेल्या आव्हानाचा सामना करताना श्रीलंका महिला संघाची सुरुवात खराब झाली. श्रीलंका संघाने एकापाठोपाठ एक विकेट गमावल्या. ठरावीक अंतराने विकेट्स पडल्यामुळे श्रीलंकेचा संघ 216 धावांत संपुष्टात आला. श्रीलंकाकडून अट्टापट्टूने 44 धावा आणि परेराने 39 धावांचं योगदान दिले.  डी सिल्वाने 48 धावांची खेळी केली. भारताकडून राजेश्वरीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर पूजा आणि मेघना यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. कर्णधार हरमनप्रीत आणि दिप्ती शर्मा यांनीही एक विकेट घेतली.  


भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत मालिका 3-0 च्या फरकाने जिंकली. भारताने पहिला सामना चार विकेटने जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेला दहा विकेटनं हरवलं होतं. आज झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने 39 धावांनी विजय मिळवला.  तिसऱ्या सामन्यात अष्टपैलू खेळी करणाऱ्या हरमनप्रीतला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याशिवाय मालिकेत मोलाची भूमिका बजावल्याबद्दल हरमनप्रीतला मालिकावीर पुरस्काराने सन्मानिक करण्यात आले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: