INDW vs NZW T20 World Cup 2024 दुबई: आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडच्या टीमनं भारतावर दणदणीत विजय मिळवला. टी 20 वर्ल्ड कपमधील भारताची पहिली मॅच न्यूझीलंड विरुद्ध होती. या मॅचमध्ये न्यूझीलंडनं भारताला 58 धावांनी पराभूत केलं. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौर हिनं सर्वाधिक 15 धावा केल्या. इतर खेळाडूंना मोठी धावसंख्या न उभारता आल्यानं आणि मोठी भागिदारी न झाल्यानं भारताला पराभव स्वीकारावा लागला. विश्वविजेतेपद मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघासाठी न्यूझीलंड विरुद्धचा पराभव मोठा धक्का मानला जात आहे.  


पहिल्यापासून सगळ्या गोष्टी भारताच्या विरोधात


न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये न्यूझीलंडनं पहिल्या 15 ओव्हरमध्येच 109 धावा केल्या होत्या. अखेरच्या 5 ओव्हर्समध्ये कॅप्टन सोफी डिवाइन आणि इतर फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली आणि संघाला 160 धावांपर्यंत पोहोचवलं. सोफी डिवाइन हिनं 36 बॉलमध्ये57 धावांची खेळी केली. भारताकडून रेणुका सिंह हिनं 2, अरुंधती रेड्डी आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.  


भारत 102 धावांवर ऑलआउट


न्यूझीलंडनं विजयासाठी ठेवलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली.  भारतानं 42  धावांमध्येच टॉप ऑर्डरचे तीन फलंदाजांच्या विकेट गमावल्या होत्या. जेमिमा रॉड्रिग्ज आणि रिचा घोष यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनुक्रमे 13 आणि 12 धावा केल्या. स्मृती मानधना हिनं 12 धावा केल्या तर शफाली वर्मा ही केवळ 2 धावा करुन बाद झाली. भारतानं 75 धावांवर 5 विकेट गमावल्या. भारताकडून सर्वाधिक 15 धावा कर्णधार हरमनप्रीत कौर हिनं केल्या. भारतानं पुढच्या 5 विकेट 27 धावांमध्ये गमावल्या आणि भारताचा संघ 102 झावांवर बाद झाला.  


न्यूझीलंडकडून रोजमेरी मायर, लिया टाहूहू यांनी दमदार गोलंदाजी केली. रोजमेरीनं 4 ओव्हरमध्ये 19 धावा देत 4 विकेट घेतल्या. तर लिया हिनं 3 विकेट घेतल्या. आता भारताची पुढील मॅच पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. 


दरम्यान, भारतानं पहिला सामना गमावला आहे तर दुसरीकडे पाकिस्ताननं श्रीलंकेला पहिल्या मॅचमध्ये 31 धावांनी पराभूत केलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 6 ऑक्टोबरला होणार आहे.  


आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये दहा संघ सहभागी झाले असून अ गटात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. तर, ब गटात बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि स्कॉटलँड या संघांचा समावेश आहे. 


इतर बातम्या :


टी-20 विश्वचषकात आज भारत न्यूझीलंडविरुद्ध भिडणार; फ्रीमध्ये सामना कुठे पाहता येणार?, A टू Z माहिती