Australia Tour of India: महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघ टीम इंडियाविरुद्ध (IND W vs AUS W) पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) शुक्रवारी (18 नोव्हेंबर 2022) या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलंय. त्यानुसार भारतीय संघ 11 ते 20 डिसेंबर दरम्यान मुंबईत ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचं यजमानपद भूषवणार आहे. महिला टी-20 विश्वचषक 2023 फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत आयोजित केला जाणार आहे, अशा परिस्थितीत विश्वचषकापूर्वी ही मालिका दोन्ही संघासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले."भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही मालिका 11 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्याचबरोबर मालिकेतील शेवटचा सामना 20 डिसेंबरला खेळला जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने मुंबईत होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यातील पहिले दोन सामने डीवाय पाटील स्टेडियमवर खेळले जातील. तर, उर्वरीत तीन सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडतील", अशी माहिती जय शाह यांनी दिली.
दक्षिण आफ्रिकेत पुढच्या वर्षी रंगणार टी-20 विश्वचषकाचा थरार
दक्षिण आफ्रिकेत पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका दोन्ही देशांसाठी महत्वाची मानली जात आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हे दोघेही 2023च्या विश्वचषकाचे प्रबळ दावेदार आहेत. हे पाहता ही मालिका रोमहर्षक ठरण्याची शक्यता आहे.
भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 9 डिसेंबर 2022 | डीवाय स्टेडियम |
दुसरा टी-20 सामना | 11 डिसेंबर 2022 | डीवाय स्टेडियम |
तिसरा टी-20 सामना | 14 डिसेंबर 2022 | ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियम |
चौथा टी-20 सामना | 17 डिसेंबर 2022 | ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियम |
पाचवा टी-20 सामना | 20 डिसेंबर 2022 | ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियम |
हे देखील वाचा-