U19 World Cup 2022: अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडला पराभूत करून पाचव्यांदा विश्वचषकाचा किताब जिंकलाय. वेस्ट इंडीज येथे रंगलेल्या अंडर-19 विश्वचषकात अनेक युवा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. यात भारतीय खेळाडूंसह अनेक देशातील खेळाडूंचा समावेश आहे. लवकरच हे खेळाडू आपापल्या देशाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. 


डेवाल्ड ब्रेविस
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू डेवाल्ड ब्रेविसनं अंडर-19 विश्वचषकात चांगली कामगिरी केलीय. ज्यामुळं त्याला अंडर-19 विश्वचषकात मालिकावीर घोषीत करण्यात आलंय. बेबी एबीच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेविसनं फलंदाजी आणि गोलंदाजीतही चांगलं प्रदर्शन केलंय. त्यानं 6 सामन्यात 84.33 च्या सरासरीनं 506 धावा केल्या आहेत आणि 7 विकेट्स घेतल्या आहेत. अंडर-19 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या नावावर होता. 


दुनिथ वेल्लालगे
यंदाच्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेल्लालगे सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय. त्यानं 6 सामन्यात 13.58 च्या सरासरीनं 17 बळी घेतले. त्याच्या गोलंदाजीसमोर फलंदाजांनी गुडघे टेकले आहेत. त्यानं गोलंदाजीसह चांगली फलंदाजीही केलीय. त्यानं या स्पर्धेत 264 धावा केल्या आहेत.


जोशुआ बॉयडेन
इंग्लंडचा गोलंदाज जोशुआ बॉयडननं अंडर-19 विश्वचषकात केलेल्या कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बॉयडन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 9.86 च्या सरासरीनं 15 विकेट्स घेतल्या आहेत. त्यांचा इकॉनॉमी रेट देखील फक्त 3.21 होता.


हसिबुल्ला खान
यंदाच्या अंडर-19 विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाला चांगला फलंदाज मिळाला आहे. हसिबुल्ला खान 380 धावांसह या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यानं या स्पर्धेत 76 च्या सरासरीनं धावा केल्या. ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. 


राज बावा
या विश्वचषकात भारताचा ऑलराऊंडर राज बावानं उकृष्ट कामगिरी केलीय. राज बावानं या स्पर्धेत 63 च्या सरासरीनं 252 धावा केल्या आहेत. तर, 9 विकेट्स घेतल्या आहेत. अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्यानं चांगली फलंदाजी केली. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून घोषीत करण्यात आलं. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha