IND Vs WI, Match Highlights : करो या मरोच्या मुकाबल्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा सात विकेटने पराभव केला. वेस्ट इंडिजने दिलेले 160 धावांचे आव्हान भारताने सात विकेट आणि 13 चेंडू राखून सहज पार केले. सूर्यकुमार यादव याने वादळी अर्धशतक झळकावले त्याशिवाय तिलक वर्मा याने नाबाद 49 धावांची खेळी केली. पाच सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने कमबॅक केलेय. पहिले दोन्ही सामने विडिंजने जिंकले होते. 


वेस्ट इंडिजने दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामी फलंदाज स्वस्तात माघारी परतले. पदार्पण करणाऱ्या यशस्वी जयस्वाल याला मोठी खेळी करता आली नाही. यशस्वी जयस्वाल फक्त एक धाव काढून बाद झाला. तर शुभमन गिल याला फक्त सहा धावांची खेळी करता आली. गिल आणि जयस्वाल बाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडणार की काय? असेच वाटत होते. पण सूर्यकुमार यादव याने सामन्याचे चित्र बदलले. सूर्यकुमार यादव याने 44 चेंडूत 83 धावांची खेळी केली. या खेळीत सूर्यकुार यादव याने 4 षटकार आणि दहा चौकार ठोकले.


सूर्यकुमार यादव याने तिलक वर्माच्या साथीने भारताला विजयाकडे नेले. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यामध्ये तिसऱ्या विकेटसाठी 51 चेंडूत 87 धावांची भागिदारी झाली. सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर तिलक वर्माने मोर्चा सांभाळला. तिलक वर्माने कर्णधाराला साथीला घेत भारताला विजय मिळवून दिला. हार्दिक आणि तिलक यांच्यामध्ये चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागिदारी झाली. तिलक वर्माने नाबाद 49 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्या 20 धावांवर नाबाद राहिला. हार्दिक पांड्याने 15 चेंडूत 1 चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 20 धावा केल्या. तिलक वर्माने 37 चेंडूत चार चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 49 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून अल्जारी झोसेफ याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. ओबेद मकॉय याला एक विकेट मिळाली. इतर गोलंदाजांची विकेटची पाटी कोरीच राहिली. 


कुलदीपचा भेदक मारा, विडिंजची 160 धावांपर्यंत मजल 


वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्मय घेतला. सलामी फलंदाज ब्रँडन किंग आणि काइल मेयर्स यांनी वेस्ट इंडिजला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनीही वेगाने धावसंख्या जमवल्या. पावरप्लेमध्ये सहा षटकात त्यांनी 38 धावा जमवल्या होत्या. ब्रँडन किंग आणि काइल मेयर्स यांनी पहिल्या विकेटसाठी  7.4 षटकात 55 धावांची भागिदारी केली. अक्षर पटेल याने काइल मेयर्स याला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. काइल मेयर्स याने 20 चेंडूत 25 धावांची खेळी केली. त्यानंतर जोनसन चार्ल्स आणि किंग यांनी विडिंजचा डाव सावरला. दोघांमध्ये चांगली भागिदारी होत होती. त्याचवेळी कुलदीप यादव याने विडिंजचा एकापाठोपाठ एक धक्के दिले. कुलदीप यादव याने लागोपाठ दिल फलंदाजांना तंबूत पाठवले. कुलदीप यादव याने चार्ल्स याला 12 धावांवर बाद केले. त्यानंतर धोकादायक निकोलस पूरन याला 20 धावांवर बाद केले. एक बाजू लावून धरणाऱ्या ब्रेंडन किंग याला 42 धावांवर कुलदीपने बाद केले. लागोपाठ विकेट पडल्यामुळे विडिंजच्या धावसंख्येला खिळ बसली. 


किंग याने 42 चेंडूत एक षटकार आणि पाच चौकाराच्या मदतीने 42 धावांची खेळी केली. चार्ल्स याने 14 चेंडूत एक षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 12 धावांचे योगदान दिले. निकोलस पूरन याने दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 12 चेंडूत 20 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात मुकेश कुमार याने हेटमायर याला तंबूत धाडले. हेटमायर याने 8 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 9 धावांची खेळी केली. कर्णधार रोवमन पॉवेल याने अखेरच्या काही षटकात विस्फोटक फलंदाजी करत विडिंजची धावसंख्या 150 पार पोहचवली.  रोवमन पॉवेल याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. पॉवेल याने फिनिशिंग टच दिला. पॉवेल याने अवघ्या 19 चेंडूत 40 धावांची वादळी खेळी केली. पॉवेल याने या खेळीत तीन षटकार आणि एक चौकार लगावला.


भारताकडून कुलदीप यादव याने भेदक मारा केला. कुलदीप यादव याने 4 षटकात 28 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या, अर्शदीप आणि युजवेंद्र चहल यांना विकेट मिळाली नाही. अक्षर पटेल याने 4 षटकात 24 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. तर मुकेश कुमार याने दोन षटकात 19 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली.