Virat Kohli Sri Lanka कोलंबो: तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहलीसोबत (Virat Kohli) गैरवर्तनाचे प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोहली सराव करत असताना एका चाहत्याने 'चोकली-चोकली' ओरडायला सुरुवात केली. कोहलीने लगेच त्या दिशेने पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की तो खूप रागावलेला आहे. 






2024 च्या T20 विश्वचषकानंतर विराट कोहली पहिल्यांदाच टीम इंडियासाठी मैदानात उतरणार आहे. विराट सोमवारी सकाळी श्रीलंकेत पोहोचला. सोमवारी पहिला सराव पावसामुळे रद्द करण्यात आला. मंगळवारी झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या फायनलनंतर कोहलीने प्रथमच नेट्समध्ये सराव केला. बीसीसीआयने अद्याप सरावाचे अधिकृत व्हिडीओ शेअर केले नसले तरी चाहत्यांनी काही व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, ज्यात कोहली चांगली फलंदाजी करताना दिसत आहे.






विराट कोहलीची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी 


चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विराट कोहली टीम इंडियाचा महत्त्वाचा सदस्य असेल. अशा स्थितीत तो श्रीलंका दौऱ्यावर होणाऱ्या वनडे मालिकेत दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे फॉरमॅटमध्ये विराट कोहलीचा रेकॉर्डही चांगला राहिला आहे. विराट कोहलीने 2008 साली श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.


विराट कोहलीची श्रीलंकेविरुद्ध तुफान फलंदाजी-


विराट कोहलीच्या श्रीलंकेविरुद्धच्या आकडेवारी पाहिली तर, त्याने 25 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10 शतकांसह 2595 धावा केल्या आहेत. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवरील त्याचा विक्रम चांगला आहे. त्याने या मैदानावर 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 644 धावा केल्या आहेत. ज्यात चार शतकांचा समावेश आहे. या मैदानावर विराट कोहलीने शेवटच्या वेळी आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी केली होती, ज्यामध्ये त्याने नाबाद 122 धावा केल्या होत्या आणि भारताने तो सामना 228 धावांनी जिंकला होता.


वनडे मालिकेचे वेळापत्रक-


2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)


4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)


7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)


संबंधित बातमी:


गौतम गंभीर-सूर्यकुमार यादवचे 4 चक्रवणारे निर्णय; श्रीलंकेच्या थिंक टँकने विचारही केला नव्हता!