IND vs SL 2nd ODI कोलंबो : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसरी वनडे मॅच कोलंबोत सुरु आहे. श्रीलंकेनं (Sri Lanka) पहिल्या मॅच प्रमाणं टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा फलंदाज फर्नांडो, कुसल मेंडिस, दुनिथ वेल्लालगे आणि कमिंडू मेंडिस यांनी केलेल्या फंलदाजीच्या जोरावर श्रीलंकेनं 9 बाद 240 धावा केल्या. तर, भारताकडून (Team India) वॉशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. भारतापुढं विजयासाठी 241 धावांचं आव्हान श्रीलंकेनं ठेवलं आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं श्रीलंकेला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर धक्का दिला. पहिल्या वनडे मध्ये दमदार फलंदाजी करणाऱ्या पथुम निसांकाला मोहम्मद सिराजनं शु्नयावर बाद केलं. यानंतर अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस या दोघांनी श्रीलंकेचा डाव सावरला. दोघांनी 74 धावांची भागिदारी केली. फर्नांडोनं 40 तर कुसलं मेंडिसनं 30 धावा केल्या. श्रीलंकेच्या दोन्ही सेट फलंदाजांना वॉशिंग्टन सुंदर यानं बाद केलं. यानंतर सदीरा समराविचकर्मा हा मोठी खेळी करु शकला नाही, त्याला अक्षर पटेलनं 14 धावांवर बाद केलं.
श्रीलंकेचा कॅप्टन चारिथ असलंका याला देखील वॉशिंग्टन सुंदर यानं 25 धावांवर बाद केलं. तर, जनिथ लियानगे याला कुलदीप यादवनं बाद केलं. गेल्या मॅचप्रमाणं यावेळी देखील दुनिथ वेल्लालगे आणि कमिंडू मेंडिस यांनी मैदानावर तळ ठोकत श्रीलंकेच्या संघाला 200 धावांचा टप्पा पार करुन दिला. दुनिथ वेल्लालगे यानं 39 धावा केल्या वेल्लालगे याची विकेट कुलदीप यादवनं घेतली. कमिंडू मेंडिस यानं अखेरीस फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला.
भारताकडून वॉशिंग्टन सुंदरची दमदार कामगिरी
भारताचा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर यानं दमदार गोलंदाजी केली. त्यानं 10 ओव्हर गोलंदाजी करुन 30 धावा देत 3 विकेट घेतल्या. कुलदीप यादवनं देखील दोन विकेट घेतल्या. तर, मोहम्मद सिराज, अक्षर पटेलनं एक विकेट घेतली.
रोहित शर्माची देखील गोलंदाजी
भारताचा कॅप्टन रोहित शर्मा यानं देखील गोलंदाजी केली. रोहित शर्मानं दोन ओव्हर टाकल्या. त्यामध्ये त्यानं 11 धावा दिल्या. रोहित शर्माला श्रीलंकेची विकेट घेण्यात यश आलं नाही. पहिल्या वनडे मॅचमध्ये शुभमन गिलनं गोलंदाजी केली होती. या मॅचमध्ये कॅप्टन रोहित शर्मानं गोलंदाजी केली.
कमिंडू मेंडिस आणि दुनिथ वेल्लालगेनं श्रीलंकेचा डाव सावरला
दुनिथ वेल्लालगे यानं पहिल्या मॅचमप्रमाणं दुसऱ्या मॅचमध्ये दमदार फलंदाजी केली. दुनिथ वेल्लालगे यानं 39 धावा केल्या. तर, कमिंडू मेंडिसनं 40 धावा केल्या. अखेर श्रीलंकेनं 50 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 240 धावा केल्या. भारतापुढं विजयासाठी 241 धावांचं आव्हान आहे.
संबंधित बातम्या :
श्रीलंकेला मोठा धक्का! अष्टपैलू वानिंदू हसरंगा स्पर्धेबाहेर; भारताला फायदा होणार?
Shubman Gill : शुभमन गिलचं वनडेतील स्थान धोक्यात येईल.. पाकिस्तानच्या माजी कॅप्टनचा सूचक इशारा