IND vs SA T20 2022: निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफिक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमीत कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतग्रस्त असल्यामुळे केशव महाराज दक्षिण आफ्रिकेकडून नाणेफेकीसाठी मैदानात उतरला. नाणेफेक जिंकून त्याने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दक्षिण आफ्रिकानं संघात तीन बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिकाकडून टेम्बा बावुमा, तरबेज शम्सी आणि मार्को जेनसन यांना आराम देण्यात आलाय. त्यांच्याजागी ट्रस्टन स्टब्स, रिजा हेंड्रिक्स आणि कगिसो रबाडाला संघात स्थान दिलेय. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. विजयी संघ कायम ठेवण्यात आलाय.
मुंबई इंडियन्सकडून यंदाच्या आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या ट्रिस्टन स्टब्सला (Tristan Stubbs) दक्षिण आफ्रिकाने संधी दिली आहे. टायमल मिल्स दुखापतग्रस्त झाल्यानंतर मुंबईने स्टब्ससोबत करार केला होता. मुंबईकडून ट्रिस्टनला संधी मिळाली होती, पण त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले होते.
पावसाचा अडथळा -
निर्णायक टी 20 सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नाणेफेकीनंतर सामना उशीराने सुरु झाला. त्यानंतर ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी फलंदाजीला सुरुवात केली. भारताच्या दोन विकेट पडल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली.
मुंबई इंडियन्सने 20 लाखांमध्ये केले खरेदी -
ट्रिस्टन स्टब्सने आतापर्यंत 17 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये 157.14 च्या स्ट्राईक रेटने 506 धावा चोपल्या आहेत. 2022 मध्ये झालेल्या आयपीएलच्या मध्यात मुंबईने स्टब्सला 20 लाख रुपयांच्या किंमतीमध्ये खरेदी केले. आठ फर्स्ट क्लास सामन्यात स्टब्सने 46. 50 च्या सरासरीने एकूण 465 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. लिस्ट ए च्या 11 सामन्यात एका अर्धशतकाच्या मदतीने 275 धावांचा पाऊस पाडलाय.
कोण आहे स्टब्स?
ट्रिस्टन स्टब्स दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू आहे. 21 वर्षीय स्टब्स विकेटकिपर फलंदाज आहे. विस्फोटक खेळी करण्यासाठी स्टब्सला ओळखले जाते. स्थानिक क्रिकेटमध्ये स्टब्सने विक्रमी फलंदाजी केली. स्टब्सने नुकत्याच झालेल्या सीएसए चॅलेंज टूर्नामेंटमध्ये वॉरियर्सकडून खेळताना 183.12 च्या स्ट्राइक रेटने धावांचा पाऊस पाडलाय.