Suryakumar Yadav on Dinesh Karthik: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकनं एकाकी झुंज दिली. परंतु, संघाला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला. या सामन्यात दिनेश कार्तिकनं अवघ्या 21 चेंडूत 46 धावांची विस्फोटक खेळी केली. यावर भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनं मजेशीर कमेंट केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दिनेश कार्तिकनं ज्या प्रकारे फलंदाजी करतोय, हे पाहून माझं संघातील चौथ्या क्रमाकांचं स्थान धोक्यात असल्याचं सूर्यानं प्लेअर ऑफ द सिरीजचं आवॉर्ड घेताना म्हटलंय. 


टी-20 मालिकेत सूर्याची चमकदार खेळी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत सुर्याकुमार यादवनं आक्रमक खेळी केली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात सूर्यानं 33 चेंडूत 50 धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही सूर्यकुमारनं विस्फोटक अंदाजात फलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यात त्यानं अवघ्या 22 चेंडूत 61 धावा केल्या. परंतु, तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात सूर्यकुमारची बॅट शांत दिसली. या सामन्यात 6 चेंडूत 8 धावा करून तो बाद झाला.


सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेण्यसाठी आलेल्या सूर्यकुमारला दिनेश कार्तिकशी संबंधित प्रश्न विचारला गेला. त्यावेळी सूर्या म्हणाला की, "दिनेश कार्तिला फलंदाजीची संधी मिळायला हवी होती. जी त्याला अखेरच्या टी-20 सामन्यात मिळाली. मला वाटतंय की दिनेश कार्तिकनं अशाच प्रकारे फलंदाजी केली तर, माझं संघातील चौथ्या क्रमांकाचं स्थान धोक्यात आहे. मी याबद्दल जास्त विचार करत नाही, पण मी याकडे लक्ष देईन."


दिनेश कार्तिकला फलंदाजीच्या अपुऱ्या संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत दिनेश कार्तिकला पुरेशी संधी मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेतही हेच पाहायला मिळालं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तर, दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याला फक्त 7 चेंडू खेळायला मिळाल्या.अखेरच्या टी-20 सामन्यात त्याला फलंदाजी पुरेशी संधी मिळाली. या संधीचं सोनं करत त्यानं 21 चेंडूत 46 धावांची वादळी खेळी केली. ज्यात चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. 


सूर्यकुमारचा जबरदस्त फॉर्म
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादवनं एकूण 119 धावा केल्या. यावर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीतही तो टॉपवर आहे. नुकतंच त्यानं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावांचा टप्पा गाठण्याचा पराक्रम केलाय.


हे देखील वाचा-