IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील टी-20 मालिका रोमांचक घडीवर होती. मात्र रविवारी (१९ जून) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला पाचवा आणि अखेरचा टी-20 सामना पावसामुळं रद्द करावा लागला, जो निर्णायक होता. या मालिकेत भारताचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत संघाची धुरा संभाळत होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं कशी कामगिरी केली? यावर एक नजर टाकुयात.
पहिला टी-20 सामना
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी-20 सामना दिल्ली येथे खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर भारतानं 20 षटकात दक्षिण आफ्रिकेसमोर 211 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तुफानी फलंदाजी केली. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 19.1 षटकातचं लक्ष्य गाठलं. रासी व्हॅन डर डसेन (46 चेंडूत 75 धावा) आणि डेव्हिड मिलर (31 चेंडूत 64 धाव) दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
दुसरा टी-20 सामना
दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं 20 षटकात सात विकेट्स गमावून 148 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 18.2 षटकात भारतानं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात हेन्रिक क्लासेननं महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, पाच सामन्याच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताल पराभूत करून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 2-0 नं आघाडी घेतली.
तिसरा टी-20 सामना
भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं मालिकेत 2-0 नं आघाडी घेतली. त्यानंतर विशाखापट्टम येथे तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलं.
चौथा टी-20 सामना
भारत दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 4th T20) यांच्यात 17 जूनला चौथा टी-20 सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 82 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. भारताच्या विजयात यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिकनं महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्यानं भारतीय संघासाठी 55 धावांचं योगदान दिलं. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
पावसाच्या व्यत्ययामुळं निर्णायक सामना रद्द
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका रंगतदार स्थितीमध्ये आली होती. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा निर्णायक सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेला. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळं हा सामना रद्द करण्यात आला. शेवटचा सामना रद्द झाल्यामुळं ही मालिका बरोबरीत सुटली . या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला विक्रम रचण्याची संधी होती. भारत दौऱ्यावर आलेला दक्षिण आफ्रिकेच्या संघान एकही टी-20 मालिका गमावली नाही.
हे देखील वाचा-