टी-20 विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज मेलबर्नमध्ये महामुकाबला झाला. त्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार विकेट्स राखून पराभव करत विश्वचषकाची दमदार सुरूवात केली. भारताच्या विजयात स्टार फलंदाज विराट कोहलीनं महत्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानच्या गोलंदाजासमोर भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसत असताना विराटनं संघाची एक बाजू संभाळून ठेवली. एवढेच नव्हे तर अखेरच्या षटकात 16 धावांची गरज असतानाही त्यानं उत्कृष्ट फलंदाजी केली. ज्यामुळं सामन्याचा निकाल भारताच्या बाजूनं लागला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडलं? यावर एक नजर टाकुयात.
पाकिस्ताननं दिलेल्या 160 धावांच्या लक्ष्याच पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारतानं 50 धावांच्या आत चार विकेट्स गमावल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतले. बढती मिळालेल्या अक्षर पटेललाही काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानंतर अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीनं विजयाचा पाया रचला. परंतु, अखेरचं षटक रोमांचक ठरलं. या षटकात 16 धावांची गरज असताना भारतानं हार्दिक आणि कार्तिकची महत्त्वाची विकेट्स गमावली. परंतु, विराटच्या जिगरबाज खेळीनं भारतानं थरारक सामन्यात चार विकेट्सनं विजय मिळवला.
भारत-पाकिस्तान यांच्यातील अखेरचं थरारक षटक
19.1: हार्दिक पांड्या आऊट
19.2: कार्तिकची एक धाव
19.3: कोहलीच्या दोन धावा
19.4: नो बॉल (विराट कोहलीचा षटकार)
19.4: वाईड बॉल
19.4: विराट कोहलीच्या तीन धावा
19. 5: दिनेश कार्तिक आऊट
19.6: वाईड बॉल
19.6: आर.अश्विनची एक धाव (अशा प्रकारे भारतानं अखेरच्या षटकात 16 धावा काढत विजय मिळवला)
भारतानं 2021च्या विश्वचषकातील बदला घेतला
दरम्यान, 2021 च्या विश्वचषकात भारताला पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पाकिस्ताननं भारताला 10 विकेट्सनं पराभूत केलं. पहिल्यांदाच पाकिस्तानच्या संघानं भारताला टी-20 विश्वचषकात पराभूत केलं. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या संघाला विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध संघर्ष करावा लागला. मात्र, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या जोडीनं अनेक वर्षांचा दुष्काळ संपवला. मात्र, आज पुन्हा भारतानं पाकिस्तानला नमवून मागच्या टी-20 विश्वचषकातील बदला घेतला.
हे देखील वाचा-