Virat Kohli and Hardik Pandya Parternship : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर टी-20 विश्वचषकातील सर्वात मोठा सामना खेळला गेला. या महामुकाबल्यात भारतानं 4 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान या विजयाची खरी शिल्पकार कोहली आणि पांड्या यांची शतकी भागिदारी ठरली. सामन्यात आधी गोलंदाजी करत भारतानं 159 धावांत पाकिस्तानला रोखलं खरं पण  160 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजी बऱ्यापैकी मोडीत काढली. पण स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी 113 धावांची विक्रमी भागिदारी केली. ज्यामुळे भारताचा विजय सोपा झाला. 


तर भारत 159 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला आणि सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा प्रत्येकी 4 धावा करुन तंबूत परतले. त्यानंतर सूर्यकुमारही 15 धावा करुन बाद झाला. मग अक्षर 2 धावांवर धावचीत झाला आणि 50 धावांच्या आतच भारताचे 4 गडी तंबूत परतले. त्यानंतर मात्र विराट आणि पांड्या यांनी एकहाती डाव सावरत एक तगडी भागिदारी उभारली. दोघांनी मिळून 113 रनांची विक्रमी भागिदारी केली, ज्यानंतर 40 रनामवर पांड्या बाद झाला. सामन्याचा सामनावीर विराट कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली आणि भारताला विजयश्री मिळवून दिला. विशेष म्हणजे भारताने टी20 सामन्यात पाकिस्तानविरुद्ध केलेली ही सर्वात मोठी भागिदारी ठरली.


सामन्याचा लेखा-जोखा


नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानला भारतासमोर आधी फलंदाजी करणं अवघड ठरत असल्यानं रोहितनं हा निर्णय़ घेतला. त्यानुसारच भारतीय गोलंदाजांनी सुरुवातही दमदार केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबरला 0 धावांवर तंबूत धाडत अर्शदीपने पहिली विकेट घेतली. त्यानंतरही भारताने गोलंदाजी कसून सुरुच ठेवली. 4 धावा करुन रिझवानही बाद झाला. पण त्यानंतर शान मकसूद (52) आणि इफ्तिकार अहमद (51) यांनी डाव सावरला आणि दोघांनी दमदार अर्धशतकं ठोकत पाकिस्तानची धावसंख्या सावरली. त्यांच्याशिवाय इतर फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण गोलंदाज शाहीन आफ्रिदीने 8 चेंडूत 16 धावांची खेळी करत आणखी योगदान दिलं. ज्यामुळे पाकिस्तानने 159 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.


भारतीय संघानं 160 धावांचं लक्ष्य गाठताना चार विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पावर प्लेमध्ये भारताने कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची महत्वाची विकेट्स गमावली. त्यानंतर सूर्यकुमार यादवही स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं संघाची जबाबदारी खांद्यावर घेत भारताच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात भारताला 16 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. मात्र, विराट कोहलीनं संघाची बाजू संभाळून ठेवत भारताला विजय मिळवून दिला.


हे देखील वाचा-