T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकातील 16 व्या सामन्यात (India Vs Pakistan) पाकिस्तानने भारताला पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विश्वचषकात भारताविरुद्ध विजय मिळवून पाकिस्तानने गेल्या अनेक वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. याआधी पाकिस्तानच्या संघाला विश्वचषकात भारताविरुद्ध एकही सामना जिंकता आला नाही. मात्र, बाबर आझमच्या नेतृत्वात आज पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने दारूण पराभव केला आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर (Dubai International Cricket Stadium) हा सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला 20 षटकात 7 विकेट्स गमावून 151 धावा केल्या. भारताने दिलेले लक्ष्य पाकिस्तानच्या सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करीत संघाला 17व्या षटकात विजय मिळवून दिला.


नाणेफेक गमवल्यानंतर भारताकडून सलामी देण्यासाठी मैदानात आलेले रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना चांगली कामगिरी करता आली नाही. रोहित शर्माने शून्यावर त्याची विकेट्स गमावली. तर, केएल राहुलने 8 चेंडूत केवळ 3 धावा करून माघारी परतले. यांच्यापाठोपाठ सुर्यकुमार यादवही 11 धावा करून आऊट झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने ऋषभ पंतला सोबत घेत किल्ला लढवला. विराटने जबरदस्त अर्धशतकी खेळी करत पंतसोबत अर्धशतकी भागीदारी केली. आफ्रिदीने भारताच्या रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना स्वस्तात तर डावाच्या शेवटी विराट कोहलीला तंबूत धाडले. विराट कोहलीने 49 चेंडूत सर्वाधिक 57 धावा केल्या. दरम्यान, भारताला 20 षटकात 151 धावापर्यंत मजल मारता आली.


या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझमने आक्रमक खेळी केली. ज्यामुळे पाकिस्तानच्या संघाला भारतावर 10 विकेट्सने विजय मिळवता आला आहे. दरम्यान, मोहम्मद रिझवानने 55 चेंडूत 79 तर, बाबर आझमने 52 चेंडूत 68 धावा केल्या.


भारत आणि पाकिस्तान संघ आतापर्यंत एकूण 12 वेळा टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकात आमने सामने आले आहेत आणि यामध्ये पाकिस्तानला एकदाही विजय मिळवला आलेला नाही. या 12 सामन्यांपैकी 5 सामने टी-20 विश्वचषकातील, तर 7 सामने एकदिवसीय विश्वचषकातील आहेत. मात्र, आजच्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पहिल्यांदाच पराभव स्वीकारवा लागला आहे. तसेच उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला पुढील सामने जिंकणे आवश्यक आहे. 


संबंधित बातम्या-