भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात आज दुबईच्या आतंरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर (Dubai International Stadium) सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत- पाकिस्तान यांच्यातील सामना दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी एका प्रकारचे युद्धच असते. विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाला एकदाही भारताविरुद्ध विजय मिळवता आला नाही. यामुळे आजच्या सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत करून इतिहास घडवावा, अशी पाकिस्तान किक्रेट चाहत्यांची इच्छा आहे. तर, भारताने विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाला धूळ चारून परंपरा कायम ठेवावी, अशी भारतीय क्रिकेट प्रेक्षकांची अपेक्षा आहे. यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे.
दुबईत सध्या या सामन्याचा ज्वर चढलेला असून मैदानातील सर्व तिकीटे विकली गेली आहेत. तर, अनेक क्रिकेटप्रेमींनी संध्याकाळचा वेळ खास या सामन्यासाठी राखून ठेवला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला आज संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात इतिहास घडणार, हे मात्र नक्की आहे.
भारत आणि पाकिस्तान संघ टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत एकूण 12 आमने- सामने आले आहेत. या 12 सामन्यांपैकी एकाही सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही. या 12 सामन्यांपैकी 5 सामने टी-20 विश्वचषकातील, तर 7 सामने एकदिवसीय विश्वचषकातील आहेत. यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहलीचे पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत चांगले प्रदर्शन राहिले आहे. आजच्याही सामन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा वर्षाव पाहायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.
संघ-
भारत संभाव्य संघ- रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन/राहुल चहर, भुवनेश्वर कुमार/शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
पाकिस्तान संभाव्य संघ- बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक/हैदर अली, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी