India vs Pakistan, 2023 Asia Cup : भारत आणि पाकिस्तान यांच्यात उद्या हायहोल्टेज सामना होणार आहे. चार वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकदिवसीय सामना होणार आहे. पाकिस्तानचा संघ सध्या आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. त्याशिवाय पाकिस्तान संघाने नेपाळविरोधात 238 धावांनी विजय मिळून दणक्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल. पण भारतीय संघाचेही पारडेही जड मानले जात आहे. जसप्रीत बुमराहच्या कमबॅकमुळे गोलंदाजीला धार आली आहे. शनिवारी होणारा हायहोल्टेज सामना रंगतदार होणार, यात शंकाच नाही.  


भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आयसीसी सामने वगळता इतर सामने होत नाही. त्यामुळे दोघांमधील लढत पाहण्यासाठी चाहत्यांचा उत्साह वाढलेला असतो. भारतीय संघ चार वर्षानंतर पाकिस्तानविरोधात वनडेमध्ये दोन हात करत आहे. भारतीय संघात चार खेळाडू आतापर्यंत पाकिस्तानविधोत खेळलेच नाहीत. यामध्ये स्टार खेळाडूंचा समावेश आहे. सलामी फलंदाज शुभमन गिल, मिडिल ऑर्डर फलंदाज श्रेयस अय्यर, विकेटकीपर फलंदाज ईशान किशन आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे आतापर्यंत पाकिस्तानविरोधात एकही वनडे सामना खेळलेला नाही. या चारही खेळाडूंचा प्लेईंग 11 मधील समावेश निश्चित मानला जातोय. पाकिस्तानविरोधात पहिल्यांदाच खेळणाऱ्या या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. श्रेयस अय्यर दुखापतीनंतर मैदानावर कमबॅक करतोय, त्याच्या कामगिरीकडेही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. दरम्यान, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनाही पाकिस्तानविरोधात आतापर्यंत एकही वनडे सामना खेळलेला नाही.


चार वर्षानंतर भारत-पाक आमनेसामने


2 सप्टेंबर 2023, शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काटें की टक्कर होणार आहे. चार वर्षांनंतर उभय संघामध्ये एकदिवसीय सामना होत आहे. याआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2019 विश्वचषकात आमनासामना झाला होता. या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली होती. त्यानंतर उभय संघामध्ये एकही एकदिवसीय सामना झाला नव्हता. आता चार वर्षानंतर दोन्ही संघ एकमेंकासमोर असतील. या सामन्यात कोण बाजी मारणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकात तीनवेळा सामना होण्याची शक्यता आहे. साखळी फेरीमध्ये दोघांचा पहिल्यांदा सामना होणार आहे. त्यानंतर सुपर 4 मध्येही या दोन्ही संघाचा सामना निश्चित मानला जातोय. दोन्ही संघांनी फायनलमध्ये लढत मारल्यास तिसऱ्यांदा आमनासामना होईल. 


केएल राहुलमुळे भारताच्या अडचणी वाढल्या - 


विकेटकिपर फलंदाज केएल राहुल अद्याप दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यामुळे आशिया चषकातील पहिल्या दोन सामन्याला तो उपलब्ध नसेल. राहुल नसल्यामुळे टीम इंडियाची अडचण वाढली आहे. मध्यक्रममध्ये कोण फलंदाजी करणार ? इशान किशन कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येणार ? यासारखे प्रश्न उपस्थित राहिलेत.